कायदा धाब्यावर बसवून आळणीचे कला केंद्र रात्रभर सुरु

उस्मानाबाद - उस्मानाबाद - येडशी रस्त्यावरील आळणी फाट्यावरील तिन्ही कला केंद्र कायदा धाब्यावर बसवून रात्रभर सुरु असून, याकडे उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळणी येथील तिन्ही कला केंद्र अनेक दिवस बंद होती.शासनाने ऑनलॉक केल्यानंतर रात्री दहापर्यंत हे कलाकेंद्र सुरु करण्यास परवनगी देण्यात आली आहे. त्यामुळे आंबटशौकिनांची पुन्हा मोठी गर्दी सुरु झाली आहे.
उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादामुळे पहाटे पाच वाजेपर्यंत हे कला केंद्र सुरु आहेत. गंभीर बाब म्हणजे काही कला केंद्रावर लावणी नृत्य पाहणाऱ्याला दारुही पुरवली जात आहे.
मध्यंतरी या तिन्ही कला केंद्रात पेटी आणि ढोलकी बंद करून डीजेच्या तालावर बारबाला डान्स करीत होत्या. त्यांच्यावर पैश्याची देखील उधळण होत होती. उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर या केंद्रावरील डीजे सध्या बंद असला तरी वेळेचे बंधन कुणीही पाळत नसल्याचे दिसून येत आहे.
पोलिसाना दरमहा ठराविक हप्ता मिळत असल्याने या कला केंद्रावर कोणतेही कारवाई होत नाही. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाने याची गंभीर दाखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.