झेडपीचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता  शेगर यांच्या कथित भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी होणार 

 
S

धाराशिव   - जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागात कार्यरत असलेले तत्कालीन उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ रामचंद्र शेगर यांनी अवैधरित्या कोट्यवधीची मालमत्ता जमविलेली आहे. त्यामुळे शेगर यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी एका पत्राद्वारे ठोस पुराव्यानिशी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे दि.१६ फेब्रुवारी रोजी केली होती. 


या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ठोस कारवाई न करता,  शेगर यांच्याशी  संगनमत करुन, हेतुपुरस्सरपणे कुठलाही निर्णय न देता बांधकाम विभागास संचिका परत करुन प्रकरणात संबंधित शेगर यांना अभय दिले असल्याने सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक इतर लाभ देऊन शासनाचे कधीही न भरुन येणारे अतोनात नुकसान केले  आहे.  

याप्रकरणी झेडपीचे सीईओ राहुल गुप्ता यांच्याविरुद्ध सुभेदार यांनी राज्य शासनाकडे तक्रार दाखल केली असता महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने त्याची गंभीर दखल घेत सुभेदार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने राहूल गुप्ता यांना ३० दिवसाच्या आत स्वयंस्पष्ट खुलासा शासनास सादर करण्याचे शासनाचे उप सचिव पो.द. देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे सीईओ राहुल गुप्ता अडचणीत आले आहेत.

तसेच सुभेदार यांनी हीच तक्रार जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकारी डॅा. सचिन ओम्बासे यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण तक्रारीची चौकशी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने केली जाणार आहे. तसे लेखी पत्र निवासी उपजिल्हाधिकारी तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव शिवकुमार स्वामी यांनी पोलीस उपअधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना दिले आहे. त्यामुळे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ रामचंद्र शेगर आणि सीईओ राहुल गुप्ता यांचे धाबे दणाणले आहेत.

S

From around the web