तेरणा कोपली , निम्मे तेर पाण्याखाली..
उस्मानाबाद - गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यात सोमवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे तेरमध्ये ४५० पेक्षा जास्त घरे पाण्याखाली आली आहेत तसेच १२० पेक्षा जास्त दुकाने, मेडिकल, ग्रामीण रुग्णालय, पेट्रोल पंप, जिल्हा परिषदेची नवीन कन्या शाळा, शनी मंदिर, आठवडी बाजार, जुने बसस्थानक आदी परिसराला पाण्याने वेढले आहे.
सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामस्थांना पुन्हा एकदा नदीचे रौद्ररूप पाहण्यास मिळाले. तेर हे तीन हजार घरांचे आणि २२ हजार लोकसंख्येचे गाव आहे. १९९७-९८ मध्ये नदीला पूर आल्याने तेर गावात अशा पद्धतीने पाणी शिरले होते. २४ वर्षांनंतर गावात पुन्हा नदीचे पाणी शिरले.
२४ वर्षांनंतर तेरणा नदीचे रौद्ररूप
तेर, रामवाडी, इर्ला, दाऊतपूर, ढोकी, तुगाव, रुई, दुधगावसह नदीकाठची गावे, वस्ती व शेतात पाणी शिरले.दाऊतपूर येथील सहा, वाकडी ( ई) येथील १७ आणि सौदना आंबा येथील सहा असे २९ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. ,त्यांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
Video