जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 96 टक्के शाळांना नळ जोडणी
उस्मानाबाद - जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 96.50 शाळांना तर 92.56 टक्के आंगणवाड्यांना नळ जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती जल जीवन मिशनच्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली.
या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जि.प.चे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुंभार, कार्यकारी अभियंता दशरथ देवकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री.नाडगौडा, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. औटी, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक मेधा शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात एकूण 1571 शाळा आहेत, त्यापैकी 1516 शाळांमध्ये नळ जोडणी करण्यात आली आहे. तालुका निहाय शाळांची संख्या आणि नळ जोडणी झालेल्या शाळांची संख्या (कंसात) अशी- भूम 147 (147), कळंब 192 (187), लोहारा 108 (106), उस्मानाबाद 362 (349), परंडा 169 (158), तुळजापूर 278 (216), उमरगा 222 (216), आणि वाशी 94 (94). उर्वरित उद्दिष्ट 55 शाळांच्या नळ जोडणीचे असून त्यापैकी 38 बोअर प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर आठ ठिकाणी दुबार/डिलीशन/हातपंपांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत 1895 अंगणवाड्यापैकी 1754 अंगणवाड्यात नळ जोडणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय अंगणवाड्याची संख्या आणि नळ जोडणी झालेल्या अंगणवाड्याची संख्या (कंसात) अशी आहे- कळंब 252 (247), तुळजापूर 308 (301), उस्मानाबाद 407 (390), उमरगा 292 (279), लोहारा 151 (142), वाशी 118 (105), भूम 173 (146) आणि परंडा 194 (144). उर्वरित उद्दिष्ट 141 अंगणवाड्यांचे आहे. 133 अंगणवाड्यांमध्ये बोअर प्रस्तावित आहेत.
जिल्ह्यातील 41 गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहेत. बहुतेक शौचालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हागणदारीमुक्तीबाबत जिल्ह्यातील 25 लाख 9 हजार 144 कुटुंबांची द्वितीयस्तर पडताळणी करावयाची आहे. जिल्ह्यातील 25 लाख 3 हजार 355 कुटुंबांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 5 हजार 789 कुटुंबांची पडताळणी शिल्लक आहे. हागणदारी मुक्ती ग्रामपंचायत द्वितीय स्तर पडताळणीचे काम जिल्ह्यात 97.77 टक्के झाले आहे. नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये म्हणून गावोगावी गुडमॉर्निंग पथकाची नेमणूक करा, नियम भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.