सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएससाठी पात्र 

उस्मानाबादचा शैक्षणिक पॅटर्न कोणत्याही परिस्थितीत निर्माण करणारच
 
as
यापुढे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी भोसले हायस्कूलमध्ये समाविष्ट करणार  - सुधीर पाटील

उस्मानाबाद - येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या शैक्षणिक संकुलात ग्रामीण भागातील विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएससह जेईई एडव्हास व इतर विविध क्षेत्रासाठी पात्र ठरत आहेत. यावर्षी या महाविद्यालयाचे बारावी विद्यार्थी एमबीबीएससाठी पात्र ठरले तर इतर क्षेत्रासाठी १०० ते १५० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात भोसले हायस्कूल लौकिक वाढला असून यापुढे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहावी पास झालेले सर्व विद्यार्थी या शैक्षणिक संकुलाच्या छत्राखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच या विद्यार्थ्यांना अद्यावत शैक्षणिक सुविधा देऊन कोणत्याही परिस्थितीत उस्मानाबादचा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणारच असा ठाम निर्धार संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला.

भोसले हायस्कूलच्या प्रशासकीय इमारतीतील कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, फोटॉन बॅच प्रमुख ए.व्ही. भगत, प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, पर्यवेक्षक तानाजी हाजगुडे, कला शाखेचे विभाग प्रमुख एन.आर. नन्नवरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आज नीट परीक्षेचा निकाल लागला असून या निकालांमध्ये श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उल्लेखनीय व‌ उत्तुंग यश मिळविलेले आहे. त्यासाठी या कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे व विद्यार्थ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत व्यवस्थित अभ्यास केल्यामुळे हे यश मिळण्यास मोलाची मदत झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात ६ विद्यार्थी एमबीबीएससाठी पात्र ठरले असून २० विद्यार्थी विद्यार्थीनी ३०० पेक्षा अधिक गुण मिळविलेले आहेत. या ठिकाणी गेल्या ७ वर्षापासून फोटॉन बॅचमध्ये नीट व जेईईसाठी विशेष तयारी करून घेतली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून खास दिल्ली, कोटा व हैदराबाद या ठिकाणाहून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) विषयाचे तज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या अभिप्रायानुसार नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे मागील २ वर्षापासून येथील विद्यार्थी अतिशय उच्च दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या व असणाऱ्या नीट व जेईई परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवित असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्राध्यापकांचे सूक्ष्म नियोजन आले कामी

उस्मानाबाद जिल्हा मागास म्हणून ओळखला जातो. त्यातच शैक्षणिक सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी हुशार असून देखील केवळ चांगले शिक्षण मिळावे यासाठी लातूर किंवा इतर शहरांमध्ये जाऊन त्यांचे पालक लाखो रुपये खर्च करतात. मात्र त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. ही बाब ओळखून या शैक्षणिक संकुलामध्ये विविध ठिकाणाहून तज्ञ प्राध्यापकांची तगडी फौज उभी केली आहे. या तज्ञ प्राध्यापकांनी देखील अतिशय सूक्ष्म नियोजन करुन या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेले सर्व प्रकारचे अध्ययन व्यवस्थितपणे मिळावे यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या संकुलामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शंका कुशंकांचे निरसन दुपारच्या सत्रात केले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये आपोआपच भर पडत आहे. 


आज लागलेल्या निकालांमध्ये ७२० गुणांपैकी अमर युवराज उंबरे - (५७५), अंकिता बालाजी कुंभार - (५४८), पंकज बाळासाहेब शिंदे - (५३८), प्रतीभा सुनील यादव - (५३०), साक्षी सुनील पवार - (५१७), प्रतिक्षा पद्माकर लोमटे - (५१२), गौरी किशोर घोडके (४९२), वृषाली उमेश गुंड - (४७२), श्रावणी गोपाळकृष्ण सातपुते - (४५७), आदित्य प्रशांत काकडे (४४२), स्नेहा सचितानंद गाढवे - (४२८) व कोमल शुक्राचार्य लांडगे - (४०८) गुण प्राप्त केले आहेत. तर २० विद्यार्थ्यांनी ३०० च्या पुढे गुण मिळालेले आहेत.

कोरोनामुळे अडथळे आले असले तरी यापुढे विद्यार्थी घडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याबरोबरच हुशार असलेल्या परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्यांना देखील विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्याचा आमचा आजपर्यंतचा प्रयत्न राहिला आहे.  तो यापुढे देखील कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

From around the web