कोविडचे रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

नियम तोडणाऱ्यावर दंड आकारणीबरोबरच कायदेशीर कार्यवाही होणार
 
कोविडचे रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी
जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे सर्व यंत्रणांना आदेश जारी

 उस्मानाबाद -   उस्मानाबाद जिल्ह्यात कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे .  सध्या राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने कोविड प्रतिबंधाबाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे .या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यावर  कायदेशीर कारवाई करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.कोरोना कालावधीतमध्ये  काढलेल्या  आदेशाप्रमाणे  आणि  जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशांन्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना या पूर्वीच दिलेल्या आहेत.

त्यानुसार   जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री . दिवेगावकर यांनी  कोविड-19 विषयी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्या  अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेतच्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात   तात्काळ कार्यवाही करणेबाबत आदेश दिले  आहेत .

इनसिडन्ट कमांडर  तथा उपविभागीय अधिकारी ,  तहसीलदार ,  अधिकारी, पंचायतींचे गटविकास अधिकारी  , नागरपालिका आणि नगर परिषदांचे  मुख्याधिकारी यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित  आणि विनाअनुदानित शाळा, विद्यालय, महाविद्यालय, बँक्वेट हॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने, आणि इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. 

या  ठिकाणी प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) मधील मर्यादेपेक्षा जास्त संख्येत लोक उपस्थित असतील, उपस्थित लोकांनी नाक आणि  तोंडावर मास्क लावलेले नसतील, हँड सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल, त्यांना प्रथम वेळी नोटीस देऊन उचित दंड आकारावा.नोटीस देताना  तपासणीत हीच परिस्थिती राहिली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये करावा. त्याच ठिकाणी दुस-या वेळेस जर अशीच परिस्थिती राहिली तर संबंधित प्रतिष्ठांनावर गुन्हा दाखल करावा अथवा सदर प्रतिष्ठान 15 दिवसांकरिता सील करण्याची कार्यवाही करावी. तसेच  सार्वजनिक ठिकाणी नाक आणि  तोंडावर मास्क न वापरणा-या व्यक्तींवर प्रथम वेळी  500 रुपये  आणि पुन्हा आढळल्यास  1000 रुपये एवढा दंड आकारावा असे या आदेशात म्हटले आहे .

          जिल्ह्यातील कोणते सीसीसी सेंटर बंद आहेत आणि कोणते सीसीसी  सेंटर चालू करावे लागणार आहेत यासंबंधीची पूर्वतयारी करावी. कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या कराव्यात, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. ज्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडला असेल त्या ठिकाणी निदान मायक्रो सिलिंग तरी करावे. पेशंटच्या घरातील सर्वांची कोविड तपासणी करावी. भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सर्व राजकीय पक्षांना राजकीय कार्यक्रम घेताना शासनाने ठरवून दिलेल्या एसओपी प्रमाणेच कार्यवाही करणे बंधनकारक असेल असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी दिले असून जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी ,  वैद्यकीय आरोग्य अधिकारी, न. प./न.पं. यांनी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या  समवेत सर्व खाजगी प्रॅक्टिस करणा-या डॉक्टरांची बैठक आयोजित करावी. 

 या बैठकीत ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील आणि  त्यांना असे वाटत असेल की रुग्णाला कोविड-19 रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत तर त्यांनी अशा रुग्णांना ताबडतोब कोविड-19 ची टेस्ट करुन घेण्यासंबंधीच्या सूचना द्याव्यात. तसेच जिल्ह्यास उपलब्ध असलेले सर्व व्हेंटीलेटर्स चालू आहेत किंवा कसे याची खात्री करुन घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, ठराविक अंतराने, हाथ साबणाने स्वच्छ धुणे याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. सर्व आगारप्रमुख राज्य परिवहन महामंडळ जिल्हा उस्मानाबाद यांनी बस स्थानकांवर तसेच बसेस मध्ये प्रवाशांकडून मास्कचा वापर आणि कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन होण्याकरिता आवश्यक कार्यवाही करावी आणि बसेसच्या चालक तसेच  वाहकांनाही त्याअनुषंगाने आवश्यक त्या सूचना द्याव्यात.असे निर्देश श्री .दिवेगावकर यांनी दिले असून सर्व इनसिडन्ट कमांडंट  यांनी त्यांच्या  अधिनस्थ असलेल्या  सीसीसी सेंटर मधील कोविड-19 च्या अनुषंगाने उपलब्धझालेली साधनसामुग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी आणि  जिल्हा प्रशासनाने दिलेल्या  सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे , असे सांगितले आहे .

          पोलीस विभाग, इनसिडन्ट कंमंडन्ट , नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी मास्क वापराच्या सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त पथकांची स्थापना करुन सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवरुन जाणा-या वाहनांची तपासणी करावी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-या व्यक्तींवर, वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही करावी असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी यांनी  कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे  श्री. तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना दैनंदिन मोफत दर्शन पास संख्या  दहा हजार आणि  दैनंदिन पेड दर्शन पास संख्या दोन हजार  एवढी निश्चित केली आहे. व्यवस्थापक,श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थाच्या व्यवस्थापकांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करावयाची आहे .  तसेच पासेस देताना 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि  दहा वर्षांखालील लहान मुले यांना तसेच मास्क न वापरणा-या भाविकांना पासेस देण्यात येऊ नयेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या   दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या धार्मिक स्थळे , प्रार्थनास्थळे याठिकाणी करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या एसओपी चे काटेकोरपणे पालन करण्यात यावेत ,असेही श्री .दिवेगावकर यांनी आदेशीत केले आहे .

          शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांची गर्दी होऊ नये याअनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयप्रमुखांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. या नोडल अधिकाऱ्यांनी  कार्यालयामध्ये येणा-या अभ्यागतांना पुन्हा दुस-या दिवशी कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता भासू नये आणि  कार्यालयामध्ये अभ्यागतांची गर्दी होऊ नये याअनुषंगाने त्यांची निवेदने,अर्ज यांवर तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी सांगून या आदेशात जिल्हाधिकारी यांनी सद्यस्थितीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थे (रेल्वे, बस इ.) द्वारे प्रवाशांची जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा/आंतरराज्य आवक-जावक सुरु झालेली असल्याने अशा प्रकारे प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी ताप, सर्दी, खोकला इ. कोविड-19 सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तात्काळ स्वत:हून गृह विलगीकरणात (Home Quarantine) रहावे आणि  तात्काळ कोविड-19 ची चाचणी करुन घ्यावी असेही श्री .दिवेगावकर यांनी या आदेशात म्हटले आहे .

From around the web