लोहारा तालुक्यातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करा 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन 

 
s

लोहारा - लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. लोहारा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांना मंगळवारी (दि.२०) निवेदन देण्यात आले.

                  या निवेदनात म्हणले आहे की, लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत गावात सध्या कोविड १९ चा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या व्यवसायावर शासनाने निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश ठिकाणी अवैध दारू विक्री, जुगार, मटका आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. 

या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. तरीही राजरोसपणे हे अवैध धंदे सुरू आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी केलेली असतानाही शेजारील कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणुन सर्रास विक्री केली जात आहे. या सर्व अवैध धंदयाना पोलिसांचा छुपा पाठिंबा आहे की काय अशी लोकांमध्ये चर्चा आहे. 

गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या चोरीच्या घटनांतील आरोपींचा शोध लागत नाही. आज अनेक गावांमध्ये राजरोसपणे खुलेआम पणे अवैध दारूची दुकाने थाठुन लोकांचे संसार उद्धवस्त केले जात आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच महिलांवरील झालेल्या अन्यायाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात लोक आले तर पोलीस ठाण्याचे अधिकारी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्याचा संबंध नसलेल्या खासगी व्यक्तीकडे पाठवत असलेच्या तक्रारी येत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे.

                 त्यामुळे लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत गावात सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. तसेच तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यातच न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, राजेंद्र कदम, जालिंदर कोकणे, शब्बीर गवंडी, नाना पाटील, प्रकाश भगत, हाजी बाबा शेख, बहादूर मोमीन,  नवाज सय्यद, स्वप्नील माटे, मनोज देशपांडे, तिरुपती चव्हाण आदी उपस्थित होते.

From around the web