समाज बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करा - प्रा.गणेश शिंदे

शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या व्याख्यानमालेस मोठा प्रतिसाद
 
ad

धाराशिव (उस्मानाबाद) - छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृतीची जोड दिली. आजच्या तरुणांनी स्वतःला आणि समाजाला घडविण्यासाठी मोठे स्वप्न बाळगावे. परंतु ते कृतीत आणण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी, असे मत प्रेरक वक्ते प्रा.गणेश शिंदे (पुणे) यांनी केले.


शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यनिमित्त सोहळ्यात बुधवारी (दि.15) रात्री शहरातील लेडीज क्लबच्या मैदानावर प्रा.गणेश शिंदे यांचे ‘शिवचरित्र व आजचा युवक’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झाले. विचारमंचावर आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर यांच्यासह डॉ.तुकाराम विधाते, प्रवीण कोकाटे  पृथ्वीराज गायकवाड, विक्रम पाटील, पंकज पाटील, रवि वाघमारे, सोमनाथ गुरव, चंद्रसेन देशमुख, प्रशांत पाटील, खलिफा कुरेशी, पृथ्वीरात चिलवंत, विशाल शिंगाडे, सक्षणा सलगर, डॉ.स्मिता शहापूरकर, शिवराज्याभिषेक सोहळा शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, उपाध्यक्ष रवी मुंडे, सचिव कंचेश्वर डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा.शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते दुसर्‍याच्या घरात, ही मानसिकता आजही बदललेली नाही. म्हणूनच आजचा तरुण भरकटत जात आहे. नोकरीच्या मागे लागलेल्या तरुणांना उद्योग, व्यवसायात उतरून करिअर घडविण्याच्या मोठ्या संधी आहेत. त्यासाठी त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. शिवरायांचे विचार अंगीकारुन आजच्या तरुणांनी वाटचाल करावी. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नव्हे, तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करुन साजरी करावी, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात गरजू कुटुंबाना प्रतिनिधिक स्वरूपात दहा शेळ्यांचे वाटप करण्यात आले.  व्याख्यानास शहरातील स्त्री, पुरुष, युवक, विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. 

शिवबाची लखलखती तलवार 

From around the web