शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांच्या पार्थिवावर अणदूरमध्ये अंत्यसंस्कार 

शिक्षण क्षेत्रातील परीस हरपला... 
 
s

अणदूर - अणदूरचे सुपुत्र, माजी आमदार, शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांच्या पार्थिव शरीरावर जवाहर महाविद्यालयाच्या मैदानावर साश्रू नयनांनी सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

. आलुरे गुरुजी  ( वय ९० ) यांचे  सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

आलुरे गुरुजी यांचा पार्थिव देह सोमवारी सकाळी अणदूर येथे आणण्यात आला. त्यांच्या राहत्या घरी अनेकांनी अंतिम दर्शन घेतले. दुपारी एका सजवलेल्या रथामध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. हलगी वाजवत त्यांचा पार्थिव जवाहर महाविद्यालयाच्या मैदानावर नेण्यात आला. येथे अनेकांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

माजी आमदार सि. ना. आलुरे हे "गुरुजी"  या टोपण नावाने परिचित होते. अणदूरच्या जवाहर विद्यालयाचे ते संस्थापक सचिव आहेत. अणदूरबरोबर त्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा सुरु करून शिक्षणाचे जाळे विणले होते. 

राजकीय, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत सहकारी म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलं. 1980 ला ते आमदारही झाले. शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते आमदार झाले. सहकार क्षेत्रांमध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी त्यांच्याच कार्यकाळात झाली.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून तालुक्यात ओळखले जात. अनेक सहकारी संस्था या गुरुजींच्या कार्यकाळात उदयाला आल्या. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे भरीव योगदान आहे. शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरच्या माध्यमातून त्यांनी तालुक्याच्या विविध भागांमध्ये शिक्षणाचे जाळे पसरवले आहे. लातूर येथील बसवेश्वर कॉलेजच्या निर्मितीतही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी कॉलेजच्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. सिद्धेश्वर सहकारी बँक (लातूर)चे संस्थापक अध्यक्ष होते.

 बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानातही ते सहभागी झाले होते. तुळजापूरमध्ये अभियांत्रिकी कॉलेज असो किंवा गरिब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करणं असो, आलुरे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.

" कर्मयोगी - परीस " हरपला.....!!

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे १९५९ ला शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूर ची स्थापना आदरणीय शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरुजी ( बाबांनी ) केली. ते त्याचे संस्थापक सचिव होते.... गोरगरीब, दिनदुबळ्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अवघे आयुष्य वेचले.... एक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केले... आज अणदूरमधील जवाहर विद्यालयातून शिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी देश - विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत, ते आजही गुरुजींनी दिलेले संस्कार व आदर्शवत मुल्ये विसरले नाहीत.... ग्रामीण भागातील सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी या शाळेच्या शाखांचे जाळे तुळजापूर तालुक्यात पसरवले..... गोरगरीब विद्यार्थ्यांना राहता यावे म्हणून मोफत वसतिगृहांची सोय केली. आपल्या पगारातील काही भाग ते गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करीत.
                 उस्मानाबाद जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रात आदर्श शिक्षणपद्धतिची क्रांती करवून दाखवली.... मराठवाड्यासह, महाराष्ट्रात दहावी शालांत प्रमाणपत्र परिक्षेत प्रथम येण्याचा मान शाळेने पटकावला....प्रात्यक्षिकांसह शिकवणे ही या शाळेची खासियत.... बाबांची आदर्शवत मुल्ये जोपासणारा शिक्षकवर्ग सकाळी दहावीचे विशेष वर्ग व रात्री सात ते अकरा वाजेपर्यंत अभ्यासवर्ग घेत असत....त्यामुळेच येथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा परिपक्व होऊनच बाहेर पडला... !!
               शिक्षणक्षेत्रासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यामातून समाजात पसरलेली अंधश्रद्धा हटवण्यासाठी प्रयत्न केले.... साधी राहणी व उच्च विचारसारणी आत्मसात करुन त्यांनी राजकारणात एक आदर्श निर्माण केला... शाळेत मुख्याध्यापक असताना १९८० मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढवली व जिंकली.... मुख्याध्याक असणारे बाबा आमदार झाले. आमदार असताना तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. राजकारणात जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शिखर बँकेचे अध्यक्ष, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष, परिवहन महामंडळाचे संचालक, एस.एस.सी.बोर्डाचे संचालक, बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर चे उपाध्यक्ष, बालाघाट शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद चे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य अशा विविधांगी जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या.
          अशा अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन आपली वेगळी छाप पाडणारे बाबा आज मात्र आम्हा परिवारातील सर्व सदस्यांना पोरके करुन निघून गेले... परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना ....
- गुरुबसप्पा नीलकंठ करपे, अणदूर.
 

From around the web