उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या 1083 शाळेत त्वरीत सेमी इंग्रजी चालू करावी

माजी जिप उपाध्यक्ष संजय दुधगावकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
 
s

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या 1083 शाळेमधील सेमी इंग्रजी माध्यम राजकीय द्वेषामुळे रद्द करण्यात आलेली आहे. ती त्वरीत चालू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे बुधवारी (दि.26) केली आहे.

पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, सन 2012-13 पासून जिल्हा परिषदेतील 1083 शाळांमधून सेमी इंग्रजी चालू करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. गेल्या नऊ वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थी शालेय स्पर्धा परिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असताना व जिल्हा परिषदेमधील शिक्षकांनी सेमी इंग्रजीचे ज्ञानदान चांगल्या प्रकारे केलेले असताना राजकीय व्देषापाटी जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्था (डायट) येथील प्राचार्यांना हाताशी धरुन सन 2018 साली ऑनलाईन लिंक करुन सेमी इंग्रजी बंद करण्यासंदर्भात गुपचूप अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांनी तयार केला. त्यानुसार सन 2022 मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सुपूर्त केला. 

संबंधित बोगस अहवालानुसार काही शिक्षक संघटनेच्या नेत्यांच्या मागणीनुसार तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व जिल्हा नेत्यांच्या आग्रहास्तव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे पाप 13 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी यांनी सेमी इंग्रजी रद्द करुन घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भाागतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक व पालक यांच्यासमोर भावी काळातील शैक्षणिक संधी नाकारल्याने मोठ्या समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेला हा एकतर्फी निर्णय त्वरीत रद्द करुन जिल्हा परिषदेला सेमी इंग्रजी पुर्ववत चालू ठेवण्याबाबत आदेशीत करावे, अन्यथा या बेकायदेशीर निर्णयाविरुध्द लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.
 

From around the web