भूम तालुक्यातील चार अवैध खडी केंद्र सील 

पोलिसांकडून गुन्हा दाखल  
 
s

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कारवाई   

उस्मानाबाद -  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती आवळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थित आणि  त्यांच्याआदेशानुसार  भूम तालुक्यामधील चार अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई करत ते सील करण्यात आले.

याबाबत  पंचनामा करण्यात आला असून  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाईही सुरू आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीमती शृंगारे , नायब तहसीलदार  सावंत , श्री राठोड, श्री पाटील तसेच मंडळ अधिकारी श्री स्वामी, श्री पाटील, श्री हाके, तलाठी श्री थोरात, श्री केदार, श्री पाटील तसेच पोलीस ठाणे भूम येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष ठिकाणी ६०० ब्रास हून अधिक बारीक खडी ,  कच विनापरवाना साठवल्याचे आढळून आला आहे . 

तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर टेकडी फोडून उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याची एटीसी  मोजणी करून त्याबाबत कारवाई केली जात आहे. या कारवाईकमी पोलिस विभागाचेही सहकार्य मिळाले आहे .

या खडी केंद्रांवर कारवाई

शिवखडा खडी केंद्रानंतर तालुक्यातील नागेवाडी येथील साईराज स्टोन क्रशर, ईट येथील श्रीराम स्टोन क्रशर, दुधोडी येथील दत्त कृपा स्टोन क्रशर, पाडोळी येथील विठ्ठल स्टोन क्रशर, अंजनसोंडा येथील अमरजित स्टोन क्रशर आणि भूम येथील शंकर स्टोन क्रशर ही सात स्टोन क्रेशर केंद्र जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सील करण्यात आली आहेत.

भूम तालुक्यातील हाडोंग्री येथील अवैध गौण खनिज उत्खनन करणारे शिवखडा स्टोन क्रशरसह इतर ६ स्टोन क्रशरवर जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. तालुक्यात उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केल्यानंतर महसूल विभागाकडून वाळू उपसा, अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना प्रशासनाकडून अभय दिला जातो काय, अशी चर्चा होत होती. परंतू जिल्हाधिकाऱ्यांनी या कारवाईतून महसूल विभाग गैरकृत्यांना पाठीशी घालत नसल्याचे दाखवून दिले आहे. 

तालुक्यात जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी ई-पिक पाहणी व तहसील कार्यालयाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पाथरुड येथे भेट दिली.भूम-पार्डी रोडने उस्मानाबादला जाताना त्यांनी हाडोंग्री येथील शिवखडा स्टोन क्रशर केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्राचे व्यवस्थापकाकडे परवानगीबाबतची कागदपत्रे मागितली.मात्र, एकही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अर्थात खडी केंद्राकडून अवैध उत्खनन केले जात असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी स्टोन क्रशरवर मोठी कारवाई केली. 

गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून स्टोन क्रशर केंद्र चालविल्याबद्दल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कारवाईची धडक मोहीम राबवत सात स्टोन क्रेशर केद्रांना सील करून त्या ठिकाणची तयार केलेली वाळू, खडीसह दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर,एक टिप्पर, एक जेसीबी व एक ब्लास्टींग मशिनसह ट्रॅक्टर, अशी सुमारे २ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. थेट स्टोन क्रशर केंद्र जिल्हाधिकारी यांनी सील करून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्याने तालुक्यातील स्टोन क्रशर चालकांचे धाबे दणाणले आहेत.विशेष म्हणजे या केंद्रानंतर परिसरातील अन्य बेकायदेशीर केंद्रांवर कारवाया करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. त्यानंतर असे अन्य ६ केंद्र बेकायदेशीर असल्याचे आढळून आले.इतक्या मोठ्या स्वरूपात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना का यावे लागले, स्थानिक अधिकाऱ्यांनीच अशा केंद्रांना अभय दिले होते का,जिल्हाधिकाऱ्यांना दिसणारे बेकायदेशीर केंद्र स्थानिक अधिकाऱ्यांना का दिसले नाही, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.दरम्यान, उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतुकीला परवानगी देण्यासाठी लाच घेताना कारवाई केली होती.महसूल विभागात अशा गैरकृत्यांना थारा दिला जाणार नाही, हे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी शुक्रवारच्या कारवाईतून दाखवून दिले आहे.


 

From around the web