विविध मागण्यांसाठी थाळी-पळी मोर्चा घेऊन शालेय पोषण आहार कामगार जिल्हाधिकारी कचेरीवर धडकले

 
s

धाराशिव  - शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी कामगारांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.१२ जून रोजी धडक मोर्चा काढून रखरखत्या उन्हात आक्रोश व्यक्त केला.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नगर परिषद मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर या कामगारांनी हातात थाळीवर पळी वाजवीत मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असलेली सेंट्रल किचन प्रणाली बंद करण्यात यावी, केरळ राज्याच्या धर्तीवर शालेय पोषण आहार कामगारांना प्रती महिना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. विनाकारण विना चौकशी कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये. दि.१ एप्रिलपासून झालेली मानधन वाढ कामगारांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. भाजीपाला व पूरक आहार बिल ऑनलाईन न करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात यावे. तसेच ते बिल त्यांच्या पगारातून कपात करून कामगारांना तात्काळ वाटप करण्यात यावी.

s

 ज्या कामगारांचे वय ६५ वर्षे झाले आहे, अशा कामगारांना सेवापुर्ती म्हणून १ लाख रुपये देऊन त्यांना ३ हजार रुपये दरमहा पेन्शन सुरू करण्यात यावी. तसेच त्याच कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव शालेय पोषण आहार कामगार म्हणून शाळेमध्ये नियुक्त करण्यात यावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा कुसुम देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश धायगुडे, विष्णु शिंदे, बाळासाहेब निकम, सोनाली साळुंके, सीमा येलदरे, मनीषा धामणे, शितल तौर, दिपाली देशमुख, मनीषा पवार, महिना पवार, निर्मला पवार, अलका भोसले आधी सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

From around the web