आळणीच्या सरपंच, ग्रामसेवक यांनी केला साडेतीन लाख रुपयांचा भ्रष्टाचार !

 
s

धाराशिव  - तालुक्यातील आळणी ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये ३ लाख ५१ हजार ५० रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून त्या रक्कमेच्या वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

धाराशिव तालुक्यातील आळणी ग्रामपंचायत अंतर्गत  सन २०१७ ते २०१९ या कालावधीत १४ व्या वित्त आयोग योजने अंतर्गत २०१७ - १८ मध्ये पाणी पुरवठा दुरुस्ती, सिमेंट रस्ता तर २०१८-१८ पाणी पुरवठा दुरुस्ती, रस्त्यावरील पोलवरील एलईडी पथदिवे, एएसएसके तसेच २०१९ - २० मध्ये आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, शाळेला गेट बसविणे, सिमेंट नाली बांधकाम (२ कामे), सिमेंट रोड करणे (३ कामे), रस्ता मजबुतीकरण, जिल्हा परिषद शाळा, मागास वस्तीमध्ये व इतर ठिकाणी आर.ओ. उभारणी (३ कामे), पाणी पुरवठा व पंप दुरुस्ती, एलईडी स्ट्रीट लाईट, होम मशीन खरेदी, एएसएसके आदी कामे करण्यात आलेली आहेत. 


या कामांमध्ये केली अनियमितता 

२०१९ - २० मध्ये अंगणवाडी लाईट फिटिंग साहित्य खरेदी व दुरुस्तीसाठी ४५ हजार रुपये, एलईडी साहित्य खरेदी व दुरुस्तीसाठी ४३ हजार रुपये, कचरा कुंडी खरेदीसाठी ११ हजार रुपये, सीसीटीव्ही बसविण्यासाठी ४८ हजार ९९८ रुपये व एलईडी टीव्ही खरेदीसाठी २ लाख ७५ हजार ९९ रुपये या कामांमध्ये अनियमितता झाली आहे. या कामाची संबंधित अभियंत्यांनी एम.बी. रेकॉर्ड केलेले नाही किंवा तपासणी देखील केलेली नाही.


या कामात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार अंबऋषी अर्जुन कोरे यांनी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.ए. भांगे यांनी २०१७ ते २०२१ या कालावधीत करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहून तपासणी केली. यामध्ये १४ व्या वित्त आयोग योजने अंतर्गत ऑनलाईन आराखड्यानुसार सर्व कामे झालेली नाहीत. तसेच झालेल्या कामांवर लेखा परीक्षण अहवालानुसार वरील नमूद २५ कामांवर ३६ लाख ४८ हजार ५२८ एवढा खर्च झाला आहे. तर या कामांपैकी १९ कामांचे मूल्यांकन झाले असून उर्वरित ७ कामांचे मुल्यांकन झालेले नाही. तसेच मूल्यांकनातील तफावत ३ लाख ४९ हजार ५० रुपये (जास्त खर्च) केल्यामुळे तत्कालीन माजी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून खुलाशा अंती वसूल करणे योग्य असल्याचे भांगे यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.


तत्कालीन माजी सरपंच महानंदा संतोष चौगुले व ग्रामसेवक एस.व्ही. मैंदाड यांच्या विरोधात गैर व्यवहार व गैरे शिस्तीचे वर्तन करून कर्तव्यात कसूर करून भंग केला असल्यामुळे प्रशासकीय कार्यवाहीसाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे या दोघा विरोधात कठोर कारवाई करण्यासह अपहारातील ती रक्कम वसूल करण्याच्या नोटिसा गट विकास अधिकारी आर.व्ही. चकोर यांनी दि.२९ मे रोजी पाठविलेल्या आहेत.
 

From around the web