धाराशिव पालिकेतील २७ कोटींचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार 

पालिकेतील क्रमांक 201 ते 203 मोजमाप पुस्तिका  गायब 
 
s
या पुस्तिकेत नेमकं दडलंय काय ? 

धाराशिव -  धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मंजूर करताच, पोलिसांनी २७ कोटीच्या घोटाळा  प्रकरणी अटक केली असता  न्यायालयाने  दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. या कस्टडीत येलगट्टे  यांनी अखेर पोलिसांसमोर  तोंड उघडले असून, मुख्य सूत्रधाराची नावे सांगितली  आहेत . त्यामुळे पालिकेतील खरे घोटाळेबहाद्दर गजाआड होण्याची शक्यता आहे. या  गुन्ह्याचा विस्तार मोठा असल्याने त्याचा  तपास  आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. 


 धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत. सहाव्या गुन्ह्यात धाराशिव न्यायालयाने जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर येलगट्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने जामीन  मंजूर करताच, पोलिसांनी २७ कोटीच्या घोटाळा  प्रकरणी अटक केली . त्यानंतर न्यायालयात उभे करण्यात आले असता  दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.  

मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह पालिकेतील काही अधिकाऱ्यावर गुन्हे नोंद असले तरी मुख्य सूत्रधार आजवर नामानिराळे होते. येलगट्टे बळींचा बकरा झाले होते, आजवर दबावामुळे त्यांनी तोंड  उघडले नव्हते, परंतु नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांनी अखेर पोलिसांसमोर तोंड उघडून मुख्य सूत्रधाराची नावे सांगितल्याचे कळते. त्यामुळे आजवर ज्यांनी भ्रष्टाचार करून बंगले बांधले, शेती घेतली, मौजमजा केली , दारू ढोसली ते गजाआड होण्याची शक्यता आहे. 


काय आहे प्रकरण ? 

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

२७ कोटींचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार 

धाराशिव पालिकेतील अनेक घोटाळे उघडकीस आले असून, तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांना आजवर बळीचा बकरा बनवण्यात आले होते. अखेर येलगट्टे यांनी  पोलिसांसमोर  तोंड उघडले असून, मुख्य सूत्रधाराची नावे सांगितली  आहेत . त्यामुळे पालिकेतील खरे घोटाळेबहाद्दर गजाआड होण्याची शक्यता आहे. या  गुन्ह्याचा विस्तार मोठा असल्याने त्याचा  तपास  आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. 

 मोजमाप पुस्तिका  गायब 

s

धाराशिव नगर पालिकेतील क्रमांक 201 ते 203 मोजमाप पुस्तिका  गायब असून अज्ञात व्यक्तीवर आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुस्तिकेत रोडची बोगस कामे दाखवून लाखो रुपयांची बिले उचलण्यात आली आहेत. सेवानिवृत्त शहर अभियंता कवडे यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या असल्याची माहिती  मिळाली आहे. आजवर  येलगट्टे यांना  बळीचा बकरा बनवण्यात आले होते. कवडे हे एका राजकीय पुढाऱ्यांचे नातेवाईक असल्याने संशयाची सुई दूरपर्यंत गेली आहे. 

बोर्डे , पवार  फरार , पोलीस सहलीवर 

धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळा प्रकरणी लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून २०  दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे यांना अद्याप अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना देखील  पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.  

पोलिसांनी आजवर दोघांना अटक करण्यासाठी पुणे, कोलापूर, मुंबई दौरे केले. पण त्यांचा दौरा पिकनिक टुर ठरला आहे. अटकेसाठी पोलिसांनी खरेच प्रयत्न केले का ? की नाटक केले ?  असा प्रश्न जनतेला पडला आहे. 

पोलीस लेखापाल सुरज संपत बोर्डे आणि लेखापरिक्षक प्रशांत विक्रम पवार यांना फरार घोषित करून, त्यांच्या संपत्तीवर टाच का आणत  नाहीत ? असा प्रश्न पडला आहे. 

From around the web