धाराशिव नगर पालिकेत २७ कोटीचा गैरव्यवहार 

निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण  येलगट्टे यांच्यासह तीन जणांविरुद्ध  गुन्हा दाखल दाखल 

 
s
निलंबित मुख्याधिकारी येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये सातवा गुन्हा दाखल

धाराशिव - धाराशिव नगर पालिकेत  मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात  गैरव्यवहार झाला असून, २७ कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण  येलगट्टे  यांच्यासह तीन जणांविरुद्ध  आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.  निलंबित मुख्याधिकारी येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये हा सातवा गुन्हा दाखल असून, आणखी दोन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.   

सातवा गुन्हा दाखल 

धाराशिव नगरपालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये एकूण सात   गुन्हे दाखल आहेत. पैकी चार गुन्हे दखलपात्र आहेत. पाचव्या  गुन्ह्यात १० दिवस पोलीस कस्टडी आणि १४ दिवस जेल भोगल्यानंतर  त्यांची जामीनावर सुटका झाली होती, पण सहाव्या  गुन्ह्यात पुन्हा अटक झाली आहे. सध्या ते धाराशिव कारागृहात बंधिस्त आहेत. सातवा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील भोकर नगर पालिकेत केलेल्या कथित भ्रष्टाचार  प्रकरणी  हरीकल्याण  येलगट्टे  चार दिवस पोलीस कस्टडीत होते. यावेळी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने त्यांना निलंबित करण्याऐवजी उलट पदोन्नती देऊन धाराशिवला बदली केली होती. 

धाराशिवमध्ये कार्यरत असताना, त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला.अनियमित बांधकाम परवाना देणे, बेकायदा  गुंठेवारी प्लॉटिंगला लेआऊट मंजूर करणे,भंगार  विकणे, नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणे, कंत्राटदारांना कामाचे बोगस  चेक देणे, विविध बँकेत अनेक खाते उघडणे  आदी प्रकरणात ते अडकले. त्यांच्या काळातील अनेक फाईल्स सध्या गायब आहेत. हरीकल्याण येलगट्टे  यांच्याबरोबर पालिकेचे दहा  कर्मचारी अडकले असून, तेही निलंबित आहेत. धाराशिव पालिकेतील कथित भ्रष्ट्राचार धाराशिव लाइव्हने चव्हाट्यावर आणला आहे. 

खरे सूत्रधार बाहेर 

धाराशिव नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून हरीकल्याण यलगट्टे कार्यरत असताना, ते पालिकेचा कारभार हाकणाऱ्या एका नेत्याच्या हातचे बाहुले झाले होते. त्या नेत्याचा एक नातेवाईक पालिकेत नगर अभियंता   पदावर कार्यरत होता, त्याने यलगट्टे  यांच्या सह्या घेऊन लाखो रुपयाचा अपहार केला. या राजकीय नेत्याने अनेक बोगस बिले काढून येलगट्टे यांना गोत्यात आणले आहे. हरीकल्याण यलगट्टे यांनी तोंड उघडल्यास खरे सूत्रधार या प्रकरणी सापडू शकतात, पोलीस एकास टार्गेट न करता, खरे सूत्रधार शोधणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 

कालाय तस्मै नमः

मागील भारतीय स्वातंत्र्य दिनी  हरीकल्याण  येलगट्टे हे धाराशिव नगर पालिकेचे  प्रशासक होते आणि त्यांच्या हस्ते पालिकेवर ध्वजारोहण करण्यात आले होते, त्याच्या पुढच्याच  वर्षी येलगट्टे भारतीय स्वातंत्र्य दिनी धाराशिव जिल्हा कारागृहात बंदिस्त असून, एक  बंदी म्हणून जिल्हा कारागृहातील ध्वजारोहणला उपस्थित आहेत. 


 

From around the web