आर .आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण

 
आर .आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण

 उस्मानाबाद - कै.आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामविकास विभागातर्फे आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत 2019-20 चे तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते दिनांक 16 फेब्रुवारी,2021 येथील डी.पी. सी. हॉल येथे करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, कृषी व पशुसंवर्धन सभापती  दत्तात्रय साळुंके व महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या गावांना आर. आर.(आबा) पाटील तालुका सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले.गोपाळवाडी (ता.उस्मानाबाद),काटी (ता.तुळजापूर), जेवळी (उत्तर) (ता.लोहारा), तुरोरी (ता. उमरगा), हसेगाव (शि.) (ता.कळंब), बागलवाडी (ता.भूम), पारा (ता. वाशी), जवळा नि.(ता. परंडा), तसेच जिल्हास्तरावरील सर्वाधिक व समान गुण प्राप्त ग्रामपंचायत काटी (ता.तुळजापुर) व ग्रामपंचायत जेवळी (उत्तर) (ता.लोहारा) या गावांना विभागून आर. आर. (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

           श्रीमती अस्मिता कांबळे यांनी पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग गावांनी सुव्यवस्थित करून काम शाश्वत टिकवावे आणि या सर्व गावात ग्रामस्थांचा सहभाग असल्यानेच या गावाला यश मिळाले आहे. असे सांगितले. जिल्हाधिकारी  दिवेगावकर म्हणाले की,प्रत्येक गोष्ट योजनेत बघायची नसून आपण ज्या गावात राहतो ते गाव स्वच्छ,सुंदर व समृद्ध झाले पाहिजे. गावाच्या समस्या सोडवण्यासाठी काम करावित व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी गावात प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, वैयक्तिक हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या मातीचे इमान राखून काम करावे,बहुमता सोबत गावाचे एकमत असणे आवश्यक आहे असे सांगितले.

 यावेळी डॉ.फड म्हणाले की, लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखावा आणि त्यातून आपले गाव सुंदर व समृद्ध गाव निर्माण करावे तसे या पुरस्कार प्राप्त गावाने काम केले असून जिल्ह्यातील प्रत्येक गावाने या योजनेत सहभागी होऊन आपले गाव सुंदर करावे.

          यावेळी श्री.साळुंके यांनी पुरस्कार प्राप्त सर्व गावांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार यांनी केले.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमती शोभा तोरखडे, राजकुमार पाटील,पंचायत समिती सदस्य श्री रामहरी  थोरबोले,जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) व पुरस्कार प्राप्त गावाचे सरपंच, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हनुमंत गादगे तर  ऋषिकेश कुलकर्णी यांनी आभार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क.प्र.अ.महेशकुमार शिनगारे यांचेसह पंचायत विभागातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

From around the web