उस्मानाबादमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शेतीच्या योजनांना प्राधान्य देत जिल्हयाची शाश्वत विकासाकडे वाटचाल: शंकरराव गडाख
 
उस्मानाबादमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उस्मानाबाद : शेती आणि शेतकरी  हा आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे. याच हेतूनं महाराष्ट्र शासन काम करीत आहे. तोच आदर्श समोर ठेवून आपल्या जिल्ह्यात शेतीच्या योजनांना प्राधान्यक्रम दिला जात आहे. यात प्रामुख्यानं पीक विमा योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून ठिबक आणि तुषार सिंचनाचं क्षेत्र वाढविण्यात आलं आहे. पीक कर्जाचं वाटपाचं प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत  चौदा टक्क्यांनी वाढवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्या जिल्हयाची आता शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ त्यांच्या हस्ते येथील तुळजाभवानी क्रीडांगणावर झाला, तेव्हा ते बोलत होते.प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री.गडाख म्हणाले,   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उध्दवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतील “विकेल ते पिकेल” ही योजना जिल्हयात राबवण्यात आली आहे. बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करणे, यासाठी शेतकऱ्यांना  प्रोत्साहन देऊन खरेदीदारांशी  जोडणे, पिकांच्या काढणी पश्चात प्रक्रिया सुविधांकरिता गुंतवणूक वाढवून निर्यातक्षम पिकांचे उत्पादन वाढविणे व कृषी उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्था मजबूत करणे या बाबींसाठी जिल्हयातून 69 प्राथमिक आराखडे सादर करण्यात आले आहेत. या संकल्पने अंतर्गत जिल्हयात 532 ठिकाणी शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून श्री.गडाख यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांची जिल्ह्यात झालेल्या कामांची नोंद घेऊन नीति आयोगाने आपल्या जिल्ह्यास तीन कोटी रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले आहे. याबद्दल मी जिल्हा प्रशासनाचे व जिल्हावासीयांचे  त्यांनी यावेळी विशेष अभिनंदनही  केले.

प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्यांच्या मागणी प्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण जाहिर केले आहे. बळीराजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन करुन पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरू आहे.या योजनेत मुद्दल आणि व्याजासह थकीत असलेले तसेच परतफेड न झालेले  दोन लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात येत आहे.आपल्या जिल्हयातील 24 जानेवारी 2021 पर्यंत 73 हजार 82 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील 69 हजार 367 शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यावर 503 कोटी 38 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

आवर्षणग्रस्त असलेल्या आपल्या जिल्हयात ऑक्टोबर 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे जिल्ह्यात एकही जीवीत हानी झाली नाही. या संकट प्रसंगी महाराष्ट्र शासनानं तातडीनं निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे जलद गतीने पंचनामे केले. या अतिवृष्टीमुळं जिल्हयातील  2 लाख 62 हजार 785 हेक्टर क्षेत्र बांधीत झालं होतं. तर बाधीत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 4 लाख 16 हजार 600 होती. या सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, शेतजमीन नुकसान, जनावरे दगावणे आणि घरांची पडझड  या सर्वांसाठी 280 कोटी 99 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे,असे सांगून श्री. गडाख यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. 1 जानेवारी  ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत आत्महत्या केलेल्या 94 शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा फेर आढावा घेऊन त्यापैकी 76 शेतकऱ्यांची प्रकरणे शासन निर्णयाप्रमाणे पात्र ठरवून त्यांच्या वारसांना प्रत्येकी  एक लाख रूपयांची मदत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी  दिली.

ग्रामीण भागामध्ये शेतीकडे जाण्यासाठी गाडी मार्ग आणि पाऊल वाटा परंपरेनं तसेच वहिवाटेने निश्चित झालेल्या आहेत.या सर्व रस्त्यांच्या नोंदी महसूल अभिलेखामध्ये आहेत.परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे. यासाठी जिल्हा महसूल प्रशासनातर्फे पहिल्या टप्यात 259 अतिक्रमित शेत रस्ते खुले करण्याची धडक मोहिम हाती घेतली आहे. आजपर्यंत जिल्हयात 55 शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री गडाख म्हणाले, आपला जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्यानं मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी जिल्हयातील आरोग्य यंत्रणेमार्फत विविध मोहिमां आणि कार्यक्रम राबविले जात आहे.कोरोना विषाणूचा समर्थपणे मुकाबला करताना जिल्हयातील आरोग्य यंत्रणा बळकट करतानांच रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला.त्यामुळं आपल्या जिल्हयात आपण मोठया प्रमाणावर कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रित ठेवण्यात यश संपादन करु शकलो. त्यामुळे 16 हजार 802 रुग्णांपैकी 16 हजार 105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता आपल्या जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असल्याने अत्यावश्यक औषध उपचारांसाठी बाहेरच्या जिल्हयांवर अवलंबून राहावं लागणार नाही,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

                महा-आवास अभियानात जिल्हा नेत्रदीपक प्रगती करत आहे. 2020-21 पर्यंत जिल्हयास 6 हजार 632 घरकुलांचं उदिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी  पाच हजार 234 घरकुलांना मंजुरी दिली आहे.बहुतेक घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. बांधकाम पूर्ण  होण्याची गती मोठी आहे.घरकूल योजनेतील तरतुदीप्रमाणे लाभार्थ्यांना अनुदानाचं वाटप करण्याबरोबरच येडोळा येथील लाभार्थ्यांना  70 हजार रूपयांपर्यंत बँकांमार्फत कर्जही उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या 28 फेब्रुवारी अखेरीस जिल्हयाचे शंभर टक्के उदिष्ट पूर्ण करण्याचा मानस आहे.ग्रामीण भागासाठीच्या  रमाई आवास योजनेसाठी 2020-21 करिता  शंभर कोटी रूपयांचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे, असे सांगून  जिल्हयातील  9 हजार 73 स्वयंसहायता गटांना 102 कोटी 12 लाख 57 हजार रूपयांचे बॅंक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेद अंतर्गत विविध स्वयंसहायता समुहांची 106 उत्पादने ॲमेझॉन या ई- कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोरोनाच्या संकट काळात जिल्हयातील  पाच  हजार दिव्यांगांना अन्न धान्य आणि जीवनावश्यक  वस्तुंच्या किट्स वाटप करण्यात आल्या आहेत,असेही त्यांनी  सांगितले.

जिल्हयात गाव तेथे देवराई,घन वन, गाव तेथे पाणवठा, जनावरांसाठी चारा, जुन्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण,  आणि आपल्या प्राचीन संरक्षित स्मारकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या प्रचार-प्रसाराचं काम जिल्हा प्रशासन करणार आहे. त्यासाठीही  माझ्या हार्दिक शुभेच्छा, देऊन पालकमंत्री गडाख यांनी आपला जिल्हा आकांक्षित जिल्हा असला तरी आपली शाश्वत विकासाकडे   वाटचाल सुरू आहे. यात शासनाबरोबरच जिल्हयातील सर्वंच घटकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. तो द्यावा अशी विनंती करतो, असे आवाहनही यावेळी श्री.गडाख यांनी केले.

        या कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवारे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक,विद्यार्थी, पालक आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

        यावेळी पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृह मंत्री पदक मिळाल्याबद्यल पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, उत्तम सेवेबद्यल पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा,महाराजस्व अभियानात पाणंद रस्ते, शेत रस्ते, अतिक्रमण मुक्तीचे काम उत्कृष्टपणे केल्याबद्यल उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, ढोकीचे मंडळ अधिकारी एन.डी.नागटिळक, गोवर्धनवाडीचे तलाठी सतीश तांबारे,कोरोना महामारीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्यल कोरोना योध्दा म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के.पाटील आणि इतर दहा वैद्यकीय अधिकारी आणि परिसेवीकांचा,जि.प. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारीकांचा कोरोना योध्दा म्हणून नगर पालिकेतील लिपिक, सफाई कामगार,वाहनचालकांचा,जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे 2017-18 आणि 2018-19 चे जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्ताचा, समाज कल्याण विभागाने घेतलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तच्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा,कृषि विभागाच्या योजना यशस्वीपणे राबविण्याचे काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


जिल्हा क्रीडा पुरस्कारप्राप्त आठ जणांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

जिल्हयातील गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्या  करिता शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो.त्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती.  

     या पुरस्कारांचे  आज प्रजासत्ताक दिनांच्या समारंभात  मंत्री, मृद व जलसंधारण, तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा क्रीडा 2017-18 चे मानकरी अमितकुमार राचलिंग भागुडे, गुणवंत खेळाडू (पुरुष) (आट्या पाट्या),ऋतुजा विठ्ठल खरे गुणवंत खेळाडू (महिला) (खो-खो), राजाभाऊ विष्णु शिंदे(पुरुष)गुणवंत क्रीडा मार्गदर्शक  (आटया-पाटया), मन्मथ भगवानराव पाळणे गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता.

जिल्हा क्रीडा 2018-19 चे मानकरी

श्रीधर राजकुमार सोमवंशी गुणवंत खेळाडू (पुरुष) (तलवारबाजी),शितल बापुराव ओव्हाळ गुणवंत खेळाडू (महिला) (आटया-पाटया),संजय मनोहर देशमुख गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (व्हॉलीबॉल),राजेश रेशमा बिलकुले गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता या सर्वांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

From around the web