दुधात भेसळ : धाराशिव जिल्ह्यात आठ ठिकाणी छापेमारी
धाराशिव - धाराशिव जिल्ह्यात दुधात आणि दुग्धजन्य पदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हयातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारीयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यांत आलेली आहे. या समितीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापेमारी करून, 8 नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात दुधामध्ये मोठया प्रमाणात भेसळ होत असल्याने, भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. दुध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्ता पुर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : एमएलके-2023/प्र.क्र.62/पदुम-8,मंत्रालय, मुंबई दिनांक. 28 जुन, 2023 अन्वये शासनाने पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी, सदस्य अप्पर पोलिस अधिक्षक, सदस्य सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सदस्य जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सदस्य उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र, सदस्य सचिव जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची समिती गठीत केली आहे.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी भेसळ तपासणी बाबत धडक मोहिम राबवुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हयातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारीयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यांत आलेली आहे. अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हास्तरीय दुध भेसळ समिती यांनी जिल्हयात दुध भेसळ रोखण्याकरीता पोलीस प्रशासन,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, वैद्यमापन शास्त्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वय साधुन संयुक्तीक कार्यवाही करुन दुध भेसळ रोखणे संदर्भात नियोजनबध्द व गोपनीयतेने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
दिनांक. 31.07.2023 रोजी उस्मानाबाद जिल्हयात भुम तालुक्यातील मे. हाके ॲग्रो प्रोडयुसर कंपनी लि. भुम ता.भुम प्लॉट क्रमांक. A-31 एम.आय.डी.सी.भुम या प्रकल्पास दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत स्वयंचलित उपकरणादवारे दुधाची तपासणी करुन गाय दुधाचे एकुण 02 नमुने घेण्यांत आलेले आहेत. सदरच्या धडक कारवाईमध्ये दिनांक. 01.08.2023 रोजी मे. प्रियदर्शनी मिल्क कलेक्शन ॲण्ड मिल्क प्रोडक्ट, मालमत्ता क्रमांक. 772, बालाजी नगर, मु.पो. शेकापुर ता.जि. उस्मानाबाद या प्रकल्पाचे दुध भेसळ तपासणी दरम्यान गाय दुध 01 नमुना, म्हैस दुध 01 नमुना व उपपदार्थ पनीर 01 नमुना असे एकुण 03 नमुने घेण्यांत येऊन सदरील नमुने विश्लेषणासाठी / तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांच्यामार्फत पाठविण्यांत आले आहेत.
जिल्हयातील कळंब तालुक्यातील मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. कळंब. ता.कळंब जि.उस्मानाबाद या प्रकल्पास दिनांक. 23.08.2023 रोजी शासन नियुक्त जिल्हास्तरीय समितीमार्फत दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत दुधाची तपासणी करुन, गाय दुध 01 नमुना, म्हैस दुध 01 नमुना व प्रक्रिया केलेले ( पिशवी बंद गाय दुध ) 01 नमुना असे एकुण 03 नमुने नमुने घेण्यांत येऊन सदरील नमुने विश्लेषणासाठी / तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांच्यामार्फत पाठविण्यांत आलेले आहेत. तथापि, उस्मानाबाद जिल्हयातील भुम, कळंब तालुक्यातील वरील प्रमाणे दुध प्रकल्पास दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत भेटी देऊन दुधाचे 08 नमुने नमुने विश्लेषणासाठी / तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांच्यामार्फत पाठविण्यांत आलेले आहेत.
जिल्हयात दुध भेसळ प्रतिबंधक समिती मार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था इत्यादी ठिकाणी दुध भेसळ तपासणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व दुध विक्रेते, दुध संकलन केंद्र, खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया यांनी उच्च गुणप्रतिचे भेसळ विरहीत दुध स्वीकृत व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह विक्री करण्याबाबत तसेच त्याकरीता वापरात येणारे वजनकाटे व दुध गुणप्रत तपासणी सयंत्रे नियमित प्रमाणीत करुन अद्यावत ठेवावे. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ व पशुखाद्य इत्यादी बाबत उत्पादन दिनांक व मुदतपुर्व वापराबाबत माहिती छापण्याविषयी सर्व विक्रेत्यांना जिल्हास्तरीय समितीने आवाहन केले आहे. दुध भेसळबाबत FSSAI टोल फ्री नं. 1800 22 2365 हा उपलब्ध करुन दिले असुन, सदर टोल फ्री नंबरवरती दुध भेसळबाबत नागरीकांनी संपर्क साधावा.
जिल्हयातील विक्रेते, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था व नागरीकांना दुध भेसळ हा कायद्याने गुन्हा आहे. दुधात खराब पाण्याची भेसळ केल्याने साथीच्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने याला आळा घालण्याकरीता या पुढील काळात कठोर कारवाई करण्यांत येईल.याची नोंद घेण्यात यावी. या संदर्भात नागरिकांनी जागरुक रहावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, उस्मानाबाद व सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत तसेच समितीच्या वतीने आवाहन केले आहे.