प्रेम शिंदे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत 

उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती 
 
x

धाराशिव - तालुक्यातील वाणेवाडी येथील काका उंबरे  यांच्या अध्यात्मिक आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याचा दि. ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली होती तर मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना अटकच केली नाही. या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे तसेच अटक करण्यात आलेल्या तिघांना देखील जामीन  मिळाला आहे. 

दरम्यान, प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याच्या  संशयास्पद मृत्यू प्रकरणी  उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती गठीत  करण्यात आली आहे. त्यात जिल्हा शल्य चिकित्सक, गट विकास अधिकारी, एकात्मिक बाल  विकास अधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नायब तहसीलदार ( रोहयो ) विधी अधिकारी मसलेकर यांचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक दि. २२ ऑगस्ट रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता  होणार आहे. 

ढोकी पोलिसांनी गुन्हा दाखल करताना काही त्रुटी ठेवल्याने आणि तपासात हलगर्जीपणा करून आरोपीना अभय दिल्याने  मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. ढोकी पोलीस निष्क्रिय ठरल्याने या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. 

d

पालकमंत्र्यांनी घेतली दाखल 

वाणेवाडीच्या आश्रमातील  काका उंबरे,  माऊली महाराज उंबरे  आणि आश्रमातील अन्य तीन जणांनी बेदम मारहाण केल्याने प्रेम शिंदे याचा मृत्यू झाला आहे. बेदम मारहाण झाल्यानंतर प्रेम शिंदे बेशुद्ध पडल्यानंतर मृत्यू झाला असे समजून त्यास गळफास देण्यात आला आणि आत्महत्येचा बनाव करण्यात आला. जेव्हा मृत्यू झाला तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यानी पोस्टमार्टम ( पीएम ) रिपोर्ट देखील गोलमाल दिला आहे. 

ढोकी पोलिसांनी आरोपीना तात्काळ अटक केली नाही. गुन्हा दाखल  करताना अनेक त्रुटी ठेवल्या, या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मयत प्रेम शिंदे  याचे वडील लहू शिंदे यांनी पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.

या निवेदनाची दखल पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतरच उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती गठीत  करण्यात आली आहे. 

s

From around the web