उमेश खोसे यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार

 
s

उस्मानाबाद -  उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्रा. शाळा (जगदंबानगर)  येथे कार्यरत उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील ४५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील एकमेव उमेश खोसे यांचा समावेश आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण शिक्षण देण्यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर मोबाइलची रेंज नव्हती तेथील मुलांना शिकवण्यासाठी ५१ ऑफलाइन अॅप्सची निर्मिती केली. 

तसेच मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोलीभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्याच बंजारा बोली भाषेत पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. यासह अनेक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोरोनाच्या काळात त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन ३६५ दिवस सुरू आहे. मुले दीक्षा अॅप तसेच इतर साधनाच्या साहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. अशा काळात त्यांनी शाळेची स्वतः ची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला. आयएसओ, उपक्रमशील, अॅक्टिव्ह स्कुल असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोरे, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, विरोधी पक्षनेते शरण पाटील, कडदोऱ्याचे सरपंच सुनंदा रणखांब आदींनी श्री. खोसे यांचे अभिनंदन केले आहे.

दुसऱ्यांदा मिळाला बहुमान !

स्वांतत्र्यपूर्व काळात शिक्षणाची सोय सुरू केलेल्या उमरगा तालुक्यात निकोप शैक्षणिक वातावरण आहे. तालुक्यातून राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संख्याही मोठी आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बाबुराव कांबळे यांना १९९१-९२ या वर्षात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला होता. आता माटेफळ ( ता. जि. लातूर) येथील रहिवाशी व गेल्या पंधरा वर्षापासून उमरगा तालुक्यात कार्यरत असलेले श्री. खोसे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

From around the web