प्रेम शिंदे याच्या आई -वडिलांची पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे कैफियत
धाराशिव - तालुक्यातील वाणेवाडी येथील एका अध्यात्मिक आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याचा शनिवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असली तरी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यास पोलिसांनी चार दिवस झाले तरी अटक केलेली नाही. पोलीस आरोपीस पाठीशी घालत असल्याची तक्रार प्रेम शिंदे याच्या आई -वडिलांची पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आज केली. विशेष म्हणजे ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि जगदीश राऊत यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री सावंत यांनी राऊत यांची कानउघडणी करून आरोपीस 24 तासात आरोपीस अटक करण्याचे निर्देश दिले.
तालुक्यातील वाणेवाडी येथे अध्यात्माच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडून लोकांकडून देणग्या उकळणारा आणि गोरगरिब विद्यार्थाना शिक्षणाच्या नावाखाली शेतात सालगडी म्हणून राबवणारा तथाकथित महाराज काका उंबरे हा ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप फरार असून, पोलीस त्यास अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप केला जात आहे. आश्रमशाळेचे संस्थापक आणि अध्यात्माचे धडे देणाऱ्या महाराजांनी प्रेम शिंदे ( वय १४ ) यास बेदम मारहाण करून नंतर त्यास गळफास दिल्याचा आरोप मुलाच्या आई - वडिलांनी केला आहे.
आरोपी काका उंबरे हा 'उघडा डोळे बघा नीट चॅनल'च्या 'कुकर्मी'चा मावसभाऊ असल्याने 'कुकर्मी'ने स्वतःच्या आणि अन्य चॅनलला बातम्या येऊ न दिल्याची तक्रार देखील प्रेम शिंदे यांच्या वडिलाची केली आहे. प्रेम शिंदे याच्या अंगावर २५ हुन अधिक जखमा असताना, आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलीस मिंधे झाले असून, आरोपीस अभय देत आहेत, असे पालकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाचा तपास ढोकी पोलिसांकडून काढून सीआयडीकडे द्यावा, भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा तसेच काका उंबरे यांच्या संस्थेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी मयत प्रेम शिंदे याच्या आई - वडिलांनी आणि सोबत आलेली नातेवाईकांनी पालकमंत्री सावंत यांच्याकडे केली . यावेळी प्रेम शिंदे याच्या आईचा हंबरडा सर्वांचा हृदय पिळवटून टाकणारा होता.