वानेवाडीच्या आश्रमातील प्रेम शिंदे याची आत्महत्या नसून खूनच
धाराशिव - तालुक्यातील वाणेवाडी येथील एका अध्यात्मिक आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याचा शनिवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असली तरी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यास पोलिसांनी पाच दिवस झाले तरी अटक केलेली नाही.
दरम्यान , याप्रकरणी आम आदमी पक्षाने लक्ष घातले आहे. प्रेम शिंदे याची आत्महत्या नसून खून असल्याचा संशय असून, त्याचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी आज आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
शेतात कामी केले नाही म्हणून आश्रमशाळेतील महाराजांनी आणि संस्थाचालक काका उंबरे यांनी बेदम मारहाण केल्यामुळेच प्रेम लहू शिंदे याचा मृत्यू झाला असून, गुन्हा लपवण्यासाठी त्याचा मृतदेह झाडास लटकावून आत्महत्याचा बनाव केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. प्रेम शिंदे याच्या अंगावर जवळपास २५ ते ३० जखमा आढळल्या असून, पाऊस पडलेला असताना मुलाच्या पायाला कुठलाही चिखल लागलेला दिसला नाही, त्यामुळे ही आत्महत्या नसून, खूनच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
पाच पैकी तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली पण त्यांना न्यायालयात पोलीस कस्टडी मागितली नाही तसेच मुख्य आरोपी काका उंबरे यास अटक केलेली नाही. त्यामुळे ढोकी पोलीस दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे तात्काळ द्यावा. तपास सीआयडीकडे वर्ग न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीगर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे ऍड अजित यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल माकोडे, सचिव मुन्ना शेख चांद शेख , युवक अध्यक्ष आकाश कावळे, उपाध्यक्ष भुतेकर सह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व पीडितांचे चे नातेवाईक उपस्थित होते.