आता गरोदर मातांनाही मिळणार कोविड प्रतिबंधक लस

 
s

उस्मानाबाद -  कोविड आजारापासून सरंक्षण होण्यासाठी मास्क, मनिटायझरचा वापर, हात वारंवार स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर पाळणे या बाबीं सोबतच कोविड, प्रतिबंधक लस हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ही लस घेतल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळतेच पण यदाकदाचित संसर्ग झालाच तर  आजाराची तिव्रता अत्यंत कमी राहते. त्यामुळे न्युमोनिया किंवा मृत्यू टाळता येतो.

कोविड प्रतिबंधक लस ही आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, 18 वर्षावरील नागरिक, स्तनदा माता यांच्याकरीता यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. आता ही लस गरोदर मातांनाही देण्यात येणार आहे. नॅशनल टेक्नीकल अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इम्युनायझेशन आणि आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने गरोदर मातांना कोविड आजाराचा धोका आणि कोविड प्रतिबंधक लसीमुळे होणारे फायदे विचारात घेवून गरोदर माताना कोविडची लस देणे बाबत मान्यता दिली आहे.

गरोदर मातांना कोविड आजार झाल्यास इतर महिलांपेक्षा गरोदर मातांमधील कोविड आजाराची तिव्रता ही अधिक असते. त्याचबरोबर गरोदर माते सोबतच तिच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही या आजारामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये कमी कालावधीची प्रसुती होणे, प्रि एक्लामशिया, सिझेरीयनची शक्यता वाढणे, अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता निर्माण होते. मातामृत्यू तथा नवजात बालकमृत्यू होणे अशा गुंतागुंती निर्माण होवू शकतात.

ज्या गरोदर मातांना मधूमेह, दमा, सिकलसेल आजार, हृदयविकार, किडनी आदी आजार असल्यास त्यांच्यामध्ये गरोदर मातांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन महिलांना धोका होण्याचे प्रमाण कोविड आजारामुळे अधिक वाढते. त्यामुळे सर्व गरोदर मातांना कोविङ-19 प्रतिबंधक लस देवून त्यांना संरक्षित करणे करीता लस देण्या बाबत मान्यता देण्यात आली आहे.

गरोदर मातांना कोविड लसीकरण मोहिमेतून यापूर्वी वगळण्यात आले होते. परंतु कोविड-19 लसीच्या सुरक्षितते बाबत झालेल्या संशोधनाच्या आधारे सध्या उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी गरोदरपणामध्ये देण्याकरीता सुरक्षित आहेत. ती दिल्यामुळे गरोदर मातांचे इतर लाभार्थ्यांप्रमाणेच कोविड आजारापासून संरक्षण मिळते. कोविडची लस घेतल्यानंतर सौम्य ताप, अंगदुखी, इंजेक्शनची जागा दुखणे असे काही सौम्य दुष्परिणाम दिसू शकतात. दीर्घकालीन दुरिणामांबाबत जरी पूर्णपणे स्पष्टता नसली तरी संशोधन व इतर देशांमधून गरोदर मातांना लस देण्याबाबत झालेल्या कार्यवाहीवरुन कोविड संसर्गामुळे होवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यापेक्षा अधिक अमल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोविड प्रतिबंधक लस गरोदर मातांना देताना त्यांना कोविड आजाराचे गरोदरपणातील धोके, कोविड प्रतिबंधक लस घेतल्यामुळे होणारे फायदे, लसीचे  संभाव्य दुष्परिणाम इत्यादी बाबत समुपदेशन करून त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि इच्छुक लाभार्थ्यांना लसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर काही दुष्परिणम उदभवल्यास त्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात येतील.

उस्मानाबाद जिल्हयामध्ये गरोदर मातांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत समुपदेशन दि. 09 जुलै 2021 रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान मधून गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या इतर आरोग्य सेवांसोबतच कोविड़ प्रतिबंधक लसीबाबत समुपदेशन आणि इच्छुक मातांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कोविड महामारीमध्ये सर्व नागरिकांसोबतच गरोदर मातांनीही स्वत:चे व होणाऱ्या बाळाचे या आजारापासून संरक्षण होण्याकरीता अधिकाधिक गरोदर मातांनी कोविडची लस घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

From around the web