७० हजारांची लाच घेताना परंडा तालुक्यातील पोलीस पाटील चतुर्भुज 

सलग दुसऱ्या दिवशी एसीबीची मोठी कारवाई 
 
lach

परंडा -  तालुक्यातील एक सरपंच पती एक लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता, त्याची शाई वाळते न वाळते तोच परंडा तालुक्यातील एक पोलीस पाटील ७० हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. हरिदास लिंबाजी हावळे ( वय 51) रा.  ढगपिंपरी असे या लाचखोर पोलीस पाटलाचे नाव आहे. 

   तक्रारदार यांना मौजे ढगपिंपरी गावच्या हद्दीतील चांदणी नदी पात्रातील वाळू उत्खनन  करण्याचा लिलाव मिळाला होता. सदर वाळू घाटावर  पाहणी साठी ग्राम दक्षता समिती नेमण्यात  आली होती. सदर समितीचे सदस्य हरिदास लिंबाजी हावळे, पोलीस पाटील,  ढगपिंपरी , ता. परांडा हे असून त्यांनी यातील तक्रारदार यांना  तुम्ही नियमबाह्य वाळू उत्खनन करताय,  त्याचे फोटो काढून महसूल विभागाला पाठवतो आणि तक्रार करतो असे सांगून फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी पंचांसमक्ष यापूर्वी दोन लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे मान्य करून दिनांक 09.03.2023 रोजी 70,000/- रुपये लाचेची मागणी करून दिनांक 24.03.2023 रोजी 70,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने आरोपीस एसीबीने  यांना ताब्यात घेतले असून  पोलीस स्टेशन परांडा  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

हा सापळा पोलीस निरीक्षक अशोक हुलगे,पोलीस अमलदार  विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी रचला होता. त्यात पोलीस पाटील हरिदास लिंबाजी हावळे हा अलगद अडकला. 

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064 असे आवाहन करण्यात आले आहे. 

From around the web