मच्छीमारांचे आंदोलन पोलिसांनी लाठीचार्ज करून मोडून काढले... 

स्थानिक मच्छिमारांना परवानगी पास देण्याची प्रशासनाची ग्वाही 
 
s

उस्मानाबाद -   सीना कोळेगाव धरणात परप्रांतीय मच्छीमारांना दिलेली परवानगी रद्द करुन परांडा व करमाळा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी सुरु असलेले मच्छीमारांचे आंदोलन पोलिसांनी लाठीचार्ज करून मोडून काढले. 

 उस्मानाबादच्या मस्त्यव्यवसाय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर ( सेंट्रल बिल्डिंग ) शुक्रवारी  काहींनी अर्धनग्न आंदोलन सुरु केलं केले होते. त्यातील एकाने रात्री विष घेतलं होत. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. आज शनिवारी पोलिसांनी हे आंदोलन  लाठीचार्ज करून मोडून काढले आहे.


दरम्यान  या धरणामध्ये करमाळा व परांडा तालुक्यातील स्थानिक मच्छिमारांना परवानगी पास देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. शिवाय सहाय्यक आयुक्त श्री. वाघमोडे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव देखील प्रादेशिक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी आयुक्तांकडे पाठविला आहे.


उस्मानाबाद येथील सिना-कोळेगाव धरणामध्ये केरळ व आंध्रप्रदेश येथील मच्छिमारांना मच्छीमारीसाठी परवाना असल्याने करमाळा व परांडा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबत मच्छीमारांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. दरम्यान जनशक्ती संघटनेने ३१ ऑगस्ट रोजी याबाबत निवेदन देऊन स्थानिक मच्छीमारांना परवाना मिळावा अशी मागणी करून ३ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार काल अतुल खूपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केले. 

आंदोलन असुन देखील कोर्टाचे कारण सांगत सहा.आयुक्त श्री.वाघमोडे हे कार्यालयात गैरहजर राहिले. त्यामुळे वैतागलेल्या आंदोलकांनी सहा.आयुक्तांच्या खुर्चीला मत्स्याहार घालून अर्धनग्न आंदोलनाल सुरुवात करत कार्यालय ताब्यात घेतले. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा सदर ठिकाणी आला होता. पोलिसांनी संबंधित विभाग व खूपसे पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सहा.आयुक्त वाघमोडे हे आंदोलन स्थळी येतो म्हणाले मात्र त्यांनी जाणीवपूर्वक भ्रमणध्वनी बंद ठेवल्याने आंदोलन आणखीनच चिघळले व आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन घोषणाबाजीला सुरुवात केली. शेवटी रात्री दोन वाजता झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी आज सकाळी रक्तदान आंदोलनाला सुरुवात केली. 

प्रशासकीय इमारतीवरून उतरून काहीजण रक्तदानासाठी, काहीजण जेवणासाठी गेले असता हिच संधी साधुन आंदोलकांना पोलिसांनी उचलून धरपकड करीत गाडीत कोंबले व पोलीस ठाण्यात नेले.

दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वरिष्ठांशी संपर्क साधला. यावेळी मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त श्री. बिराजदार यांनी वरिष्ठ आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवून कामामध्ये हयगय करणाऱ्या सहा.आयुक्त श्री. वाघमोडे यांच्यावर कारवाई करून त्वरित बदली करण्यात यावी असा प्रस्ताव पाठविला आहे. शिवाय स्थानिक मच्छीमार यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या देखील या प्रस्तावामध्ये पाठविल्या असून दि.७ सप्टेंबर रोजी याबाबत सविस्तर बैठक घेऊन स्थानिक मच्छिमारांना परवानगी देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.


आक्रोश... किंचाळ्या अन् धरपकड

- सिना कोळेगाव धरणात मच्छीमारीसाठी जोपर्यंत आम्हाला परवाना मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा पवित्रा घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी धरपकड व उचलबांगडी करून चौथ्या मजल्यावरून ताब्यात घेतले व पोलीस व्हॅन मध्ये आणून कोंबले. शिवाय काही महिलांना सुद्धा ढकलाढकली करत गाडीमध्ये घातले. त्यामुळे महिला व लहान मुलांचा उस्मानाबाद प्रशासकीय इमारतीच्या खाली आक्रोश अन् किंचाळ्या ऐकायला मिळत होत्या.


अन्यथा पुन्हा आंदोलन

s

- प्रादेशिक आयुक्त यांच्या पत्रावर विश्वास ठेवुन पोलीसांच्या विनंतीनुसार आज आंदोलन तुर्तास थांबविले आहे. पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे सहा.आयुक्त श्री.वाघमोडे यांच्यावर कारवाई करावी कारण ह्या महाशयाने भागीदारी करुन ठेकेदारी करत स्थानिक मच्छीमारांवर अन्याय केला आहे. शिवाय परप्रांतीय मच्छीमारांचा परवाना रद्द करुन स्थानिकांना परवानगी द्यावी. अन्यथा पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. 

- अतुल खुपसे पाटील

प्रदेशाध्यक्ष, जनशक्ती संघटना

s

s


 

k

From around the web