कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांनी तातडीने टेस्ट करून उपचार घ्यावेत 

- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जनतेला आवाहन
 
कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांनी तातडीने टेस्ट करून उपचार घ्यावेत

उस्मानाबाद -  जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आज घडीला 659 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 74 रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर, 62 रुग्ण आयसीयूमध्ये भरती आहेत, तर 18 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यात गंभीर रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर रुग्णालये कमी पडतील, व्यवस्था कमी पडेल, तेव्हा कोरोनाची लक्षणं असलेल्या नागरिकांनी तातडीने कोरोना टेस्ट करून उपचार घ्यावेत, आजार अंगावर काढू नये, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

       जिल्ह्यात 28 मार्च 2021 च्या अहवालानुसार कोरोनाच्या रुग्णांची ही संख्या आहे. गेल्या काही दिवसात अतिगंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सर्दी, ताप, खोकला, वास न येणे, तोंडाची चव जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी सर्व कोरोनाची लक्षणे असताना लोक अंगावर आजार काढत आहेत किंवा तात्पुरता उपचार करून कोरोनाची टेस्ट करण्यासही टाळत आहेत. त्यामुळे असे नागरिक गंभीर रुग्ण होऊन अतिदक्षता विभागात ऐनवेळी दाखल होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना वाचवणे कठीण होत आहे, असेही श्री. दिवेगावकर यांनी त्यांच्या जाहीर निवेदनात भावना व्यक्त केल्या आहेत.

       सध्या जिल्ह्यात 1100 पेक्षा जास्त ऑक्सीजन बेड्स उपलब्ध आहेत. 118 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी लोकांनी कोणताही आजार अंगावर काढू नये आणि आजाराची कोणतीही लक्षणं आढळून आल्यास तात्काळ चाचणी करून घेऊन प्राधान्याने उपचार घ्यावेत. आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणे आपल्या कुटुंबासाठी हानिकारक ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन लोकांनी गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
 

From around the web