... अन्यथा उस्मानाबाद जिल्ह्यातील पेट्रोल पंप बेमुदत बंद
उस्मानाबाद - जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावाखाली होत असलेल्या केमिकल युक्त अवैध डीझेलच्या विक्रीवर कार्यवाही न केल्यास बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनने दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून धुळे बेंगलोर व मुंबई हैद्राबाद हे राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या ६ महिन्यांपासून केमिकल युक्त बायोडिझेल च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि धाब्यांवर विना परवानगी केमिकल युक्त डिझेलची सर्रास विक्री चालू आहे. या केमिकल विक्रीला जिल्हा प्रशासन कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालय यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यात एकही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही व कोणत्याही कार्यालयात याची नोंद नाही. तसेच राष्ट्रीय महामार्ग व ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्याबाबत चा कुठलाही परवाना न घेता मोठ्या प्रमाणात याची विक्री चालू आहे. हे केमिकल ज्वलनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊ शकते. या केमिकल युक्त डिझेलमुळे राज्य शासनाचा महसूल बुडत आहे व पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.
ज्याअर्थी आय ओ सी एल, बी पी सी एल, एच पी सी एल या मानांकन शासकीय कंपन्यांच्या सर्व शासकीय कार्यालयाच्या परवानगी घेऊन व शासकीय मानांकन असलेले डीझेल व पेट्रोलची विक्री अधिकृत पंपावरून होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील बायोडिझेल च्या नावाखाली होत असलेल्या केमिकल युक्त अवैध डीझेल च्या विक्रीवर कार्यवाही करावी या मागणीसाठीजिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, रज्जाक अत्तार, प्रशांत चेडे, रवींद्र शेरखाने, जिल्हा सचिव गिरीश हंबीरे, उस्मानाबाद शहराध्यक्ष वैभव उंबरे, शहर सचिव प्रदीप खामकर, तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले, तालुका सचिव प्रशांत पाटील, कांबळे, परीक्षित खामकर, वैभव खंडागळे तसेच जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.