सांगवी काटी : सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला अटक

 
सांगवी काटी : सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला अटकउस्मानाबाद - सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी काटी (ता. तुळजापूर)  ग्रामसेवकाला उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करून तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे सांगवी काटी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई असून त्यांचे शिपाई या पदाचे मंजुरीसाठी व भविष्य निर्वाह निधीचे अकाऊंट ऑनलाइन करणेसाठीचे कागदपत्रे पंचायत समिती, तुळजापूर येथे पाठविण्याच्या कामासाठी सांगवी काटी तालुका तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील ग्रामसेवक विजय नारायण चित्ते यांनी 7000/- रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे तक्रार दिली असता आज दि.१०/८/२०२० रोजी सापळा लावून त्यांस तेवढया रकमेची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे.याबाबत तुळजापूर पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला प्र वि औरंगाबाद व प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पो नि गौरीशंकर पाबळे, पो.ह. रवींद्र कठारे,पो. ना. मधुकर जाधव पो. शि. विष्णू बेळे, समाधान पवार,महेश शिंदे व चालक ज्ञानदेव कांबळे यांनी केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिलेबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी केले आहे.

From around the web