सोयाबीन नुकसानी च्या भरपाईसाठी विमा कंपनीच्या अँप वर ऑनलाइन अर्ज करावेत - आ. राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद - सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे तर दुसऱ्या आठवड्यात अतीवृष्टीने सोयाबीन सह इतर पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या होत्या, त्या अनुषंगाने पंचनामे सुरू देखील आहेत, परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी वैयक्तिक पंचनामे होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या अँप वर पंचनामे करून घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत असे आवाहन आ.राणा जगजितसिंहजी पाटील यांनी केले आहे.
मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठा पाऊस होत आहे. आजवर जेमतेम पिका एवढा पाऊस झाल्याने सोयाबीनची परिस्थिती समाधानकारक होती, मात्र आत्ताच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान होत आहे. ऐन काढणी वेळी पाऊस होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या वर्षीचीच परिस्थिती पुन्हा उद्भवते की काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. येडशी ता. उस्मानाबाद येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गणेश लवटे यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. माजी अध्यक्ष नेताजी पाटील, सभापती दत्तात्रय देवळकर, पंचायत समितीचे उपसभापती संजय लोखंडे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. राजाभाऊ पाटील, सोमनाथ लवटे, नितिन लवटे, कैलास लवटे, शंकर मोहिते यांच्यासह कृषि सहाय्यक महादेव देवकर आदी उपस्थित होते.
सप्टेंबर महिन्या मधील आज वरच्या सरसरीपेक्षा जिल्ह्यात ५२% पाऊस जास्त झाला आहे. या पावसा मुळे झाडाच्या शेंगा फुटून मोड येत आहेत, तर पाणी साठलेल्या ठिकाणचे सोयाबीन जाळून जात आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतकरी सोयाबीन पिकाचा विमा भरतात. विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळणेसाठी पंचनामे होणे आवश्यक असून यासाठी विमा कंपनीच्या crop insurance या अँप वर वैयक्तिक ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनी व कृषी विभागाचे प्रतिनिधी पंचनामे करून झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला देतात, व या नुकसानीच्या अनुषंगाने पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. ऑनलाइन अर्ज करून पंचनामे करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अती पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांनी विमा कंपनीचे crop insurance हे अँप डाउनलोड करून या नवीन कार्यप्रणाली द्वारे ऑनलाइन वैयक्तिक अर्ज करावेत असे आवाहन आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी केले आहे. याकामी काही अडचणी आल्यास अथवा सहकार्याची गरज असल्यास संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा.
नुकसानीची व्याप्ती पाहता, राज्य/केंद्र आपत्ती निवारण प्रतिसाद निधीच्या माध्यमातून देखील हेक्टरी अनुदान मिळणे आवश्यक असून त्यानुषंगाने देखील पाठपुरावा सुरू असल्याचे आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी संगितले आहे.