मग धार्मिक स्थळे उघडण्यास नेमकी अडचण काय - आ. राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद - राज्यात अनेक तास एकत्र बसून बस, रेल्वे व विमानसेवेला परवानगी देण्यात आली आहे, या बरोबरच जवळपास सर्वच ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, परंतु राज्यातील धार्मिक स्थळे मात्र भाविकांसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. राज्यातील जनतेचा असंतोष वाढत असून जन भावनेचा आदर करत भाविकांसाठी धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. संत परंपरेचा वारसा लाभलेल्या राज्यात मागील ७ महिन्यापासून भाविकांसाठी धार्मिक स्थळे बंद आहेत. ज्या भवानी मातेच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली त्या महाराष्ट्राच्या कुलस्वामीनीचे आई तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील बंदच आहे.
राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत असून हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. अनलॉक च्या विविध टप्प्यामध्ये आता जवळजवळ सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. परंतु दुर्दैवाने अनेकांची श्रध्दास्थाने असलेली धार्मिक स्थळे मात्र बंदच आहेत. मुंबईतील लोकल ट्रेन म्हणजे गर्दीचा सर्वाधिक उच्चांक. ती देखील महिलांसाठी आता सुरू करण्यात आली आहे. अनेक तास एकत्र जवळ बसून बस, रेल्वे व विमानाचा प्रवास देखील राज्यभर चालू आहे. सरकारकडून सर्वांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे, परंतु इतर राज्यातील धार्मिक स्थळे खुली असताना महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे मात्र खुली करण्यात येत नाहीत, हा विरोधाभास समाजण्या पालिकडे आहे.
तिरुपती बालाजी, वैष्णोदेवी सारखी प्रमुख धार्मिक स्थळे नियम व अटींच्या अधीन राहून अनेक महिन्यांपूर्वीच भाविकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. तुळजापूर सारख्या राज्यातील अनेक शहरातील अर्थकारण धार्मिक स्थळाशी निगडित आहे. धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे अशा शहरातील अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर च्या वापरासह सोशल डिस्टनसिंगचे कठोर पालन करून मंदिरे सुरू करणे आता आवश्यक झाले आहे.
धार्मिक स्थळे बंद असल्याने परिसरातील लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ येत आहे. इतर राज्यांमध्ये मंदिरे, प्रार्थनास्थळे चालू आहेत परंतु महाराष्ट्रामध्येच बंद आहेत. दारूची दुकाने, हॉटेल्स, मॉल्स देखील सुरू आहेत. परंतु धार्मिक स्थळे बंद ठेवणे, हा एक प्रकारे भविकांसह निगडित अर्थकारण असलेल्या पुजारी व व्यापाऱ्यांवर अन्यायच आहे. राज्य सरकारकडून जनतेची निश्चितच ही अपेक्षा नाही.
या पूर्वी देखील राज्याची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊन राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याबाबत आ. राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे अनेक वेळा विनंती केली होती. परंतु आजवर निर्णय मात्र झाला नाही. आता परिस्थिती अत्यंत गंभीर होत असून जनसामान्यांतील असंतोष तीव्र झाला आहे.
त्यामुळे जन भावनेचा आदर करत भाविकांच्या श्रद्येचा व धार्मिक स्थळाशी निगडित उपजीविका असणाऱ्या इतरांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करावीत, अशी आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांनी राज्यातील जनतेच्या वतीने पुनच: एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.