अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैगिंक अत्याचार

 


आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार दंडाची शिक्षा 

 अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैगिंक अत्याचार


उस्मानाबाद - अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेवून वारंवार लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी कृष्णा दत्तू शिंदे ( वय २४, रा. धारूर, ता. उस्मानाबाद ) यास १० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल तदर्थ जिल्हा व सत्र  न्यायाधीश श्रीमती आर.जे. राय  मॅडम यांनी दिला. 


या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की , १४ जुलै २०१७ रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन बेंबळी येथे हजर राहून त्यांच्या अल्पवयीन मुलीस आरोपी कृष्णा दत्तू शिंदे ( वय २४, रा. धारूर, ता. उस्मानाबाद ) याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले बाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या प्रकरणात पोलीस तपासात  असे निष्पन्न झाले होते की , सदर आरोपीने पीडितेस प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैगिंक अत्याचार केले होते तसेच १३ जुलै २०१७ ते १४ जुलै २०१७ रोजीच्या मध्यरात्री आरोपीने पीडितेस फूस लावून सातारा, पुणे येथे  नेवून त्या ठिकाणी तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एल. जमदाडे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 


या प्रकरणाची सुनावणी  तदर्थ जिल्हा व सत्र  न्यायाधीश श्रीमती आर.जे. राय  मॅडम  यांच्यासमोर झाली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी कृष्णा दत्तू शिंदे यास भादंवि ३७६ (२) (एन) ३६३ व पोस्को  कायद्याच्या कलम ४ व ६ नुसार दोषी धरून आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 

From around the web