उस्मानाबाद : अत्यावश्यक सेवा वगळता सर्वप्रकारची दुकाने आजपासून बंद

 
उस्मानाबाद : अत्यावश्यक सेवा वगळता सर्वप्रकारची दुकाने आजपासून बंद

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून (दि.६) सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. सर्व प्रकारचे आठवडी बाजार बंद व पार्सल सेवे संदर्भातील पूर्वीचे आदेश कायम ठेवण्यात आले असून संचारबंदी तथा जमाबंदी संदर्भात नवीन आदेश लागू करण्यात आले आहेत.


जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नव्या आदेशामुळे लॉकडाऊनसदृश परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. राज्य सरकारने केवळ कडक निर्बंध लावले असताना देखील जिल्ह्यात लॉकडाऊन प्रमाणेच नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. परंतु, यामधून दवाखाने किराणा साहित्याची दुकाने, भाजीपाला, दूध संकलन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मान्सूनपूर्व कामे करणारी सर्व कार्यालय, मालवाहतूक, कृषीविषयक सेवा, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वगळण्यात आली आहेत. 

यासोबतच जिल्ह्यातील बगीचे, सार्वजनिक मैदाने, खेळाची मैदाने, योगा क्लासेस, जिम, व्यायाम शाळा, जलतरण तलाव या सोबतच सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. या सोबतच सर्व दुकाने, बाजारपेठा व मॉल्स पूर्णपणे बंद राहतील. पान टपरींबाबत पूर्वीचे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याही बंद ठेवण्याबाबत बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुरू असलेल्या सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या आवारामध्ये ग्राहकांना सुरक्षित अंतराचे पालन करता येण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे तसेच ग्राहकांनी कोठे उभे राहावे याबाबत खुणा करण्याबाबत सांगण्यात आले आहे. सर्व दुकानदार व दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींनी लसीकरण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच काच किंवा अन्य आच्छादनाच्या आडून ग्राहकांशी संवाद साधणे व व्यवहार करण्याबाबत बजावण्यात आले आहे.

शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू असणार आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास गर्दी जमा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या दिवशी अन्य वेळेत संचारबंदी असणार आहे.हॉटेल मधून सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ या वेळेमध्ये पार्सल घेऊन जाता येणार आहे. हे सर्व आदेश ३० एप्रिल पर्यंत कायम राहतील.

ऑटोरिक्षातून दोघांना प्रवास

वाहनातून प्रवास करण्यासाठीही निर्बंध टाकण्यात आले आहेत. रिक्षातून केवळ दोघांना प्रवास करता येणार आहे. टॅक्सी मधून ५० टक्के क्षमतेने तर बस मधून केवळ असं क्षमतेनुसार प्रवास करण्यास अनुमती असेल. परंतु उभे राहून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना मास्क वापरणे व वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते आठ या वेळेत खासगी बसेस व वहाने सुरू राहतील. अन्य दिवशी केवळ तातडीने किंवा अत्यावश्यक सेवेसाठी वाहन सुरू राहतील.
 

From around the web