महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीसाठी मिशन युवा स्वास्थ मोहिमेचे आयोजन
उस्मानाबाद - जिल्हयातील 18 वर्षावरील वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण सध्या सुरू आहे.यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18-44 वर्ष वयोगटातील 42.76 टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस घेऊन झाला आहे. केवळ 9.10 टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.त्यामुळे अजूनही अनेक तरूण मुला- मुलीचे लसीकरण होणे बाकी आहे.हा वयोगट अत्यंत क्रियाशील असल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्यामुळे या वयोगटातील सर्वांचे लसीकरण पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.
20 ऑक्टोंबर 2021 पासून महाविद्यालयमधील ऑफलाईन वर्ग आणि पाठयक्रम पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे.त्यामुळे महाविद्यालयीन 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासनाने 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये मिशन युवा स्वास्थ्य मोहिम राबविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
मिशन युवा स्वास्थ मोहिम अंतर्गत महाविद्यालयामधून कोविड -19 लसीकरणासाठी विशेष सत्र आयोजित केले जाणार आहेत.यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे महत्व नागरिकांना जाणवून देण्याकरिता लसीकरण सत्राच्या दिवशी बँनर.पोस्टर व्दारे कोविड-19 प्रतिबंधात्मक आचारण आणि लसीकरणाची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. लसीकरण सत्रामधून अद्याप लस न घेतलेल्या सर्व विद्यार्थी,महाविद्यालयीन प्राध्यापक अधिकारी आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कोविड-19 चे लसीकरण करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील महाविद्यालयातील 18 वर्षा वरील सर्व विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण मोहिम पूर्ण करून मिशन युवा स्वास्थ मोहिम ही मोहिम यशस्वीपणे पार पाडावी, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहूल गुप्ता यांनी आवाहन केले आहे.