धाराशिवमध्ये अवयवदान जनजागृती अभियानास सुरुवात

 
s

धाराशिव :- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या मार्फत सर्व महाराष्ट्रामध्ये अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

 जगातील पहिले मानवी अवयव प्रत्यारोपण 1954 मध्ये झाले, तर भारतात 1971 मध्ये सीएमसी वेल्लोर येथे करण्यात आले. दुर्दैवाने 50 वर्षांनंतरही भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज आपल्याकडे जे काही अवयव प्रत्यारोपण होत आहे त्यात बहुसंख्य थेट संबंधित दात्यांकडून आहेत, तर ब्रेनडेड रुग्णांचे कॅडेव्हरिक अवयवदान नेहमीच मागे राहिले आहे. या उदात्त आणि मानवी कारणांसाठी पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात दहा हजारांपैकी केवळ एक रुग्ण अवयवदानासाठी संमती देतो, तर पाश्चिमात्य देशांत 10 हजार लोकसंख्येपैकी सुमारे 3500 लोकांमध्ये अवयवदानासाठी संमती मिळते.

 सध्या भारतात सुमारे 570 अवयव प्रत्यारोपण केंद्रे असून केवळ 140 नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर्स आहेत, जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत. दुसरं म्हणजे यातील बहुसंख्य खाजगी संस्था आहेत, जिथे उपचारांचा खर्च सर्वांना परवडणारा नाही.

सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी 2 लाख मूत्रपिंड आणि 1 लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ 4000 मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि 500 यकृत प्रत्यारोपण केले जात असून हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत. हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून, पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ 20 ते 30 हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. जेव्हा लोकसंख्येने हे पारंपारिक प्रत्यारोपण स्वीकारले नाही, तेंव्हा हात प्रत्यारोपणासारख्या नवीन पद्धतींचा विचार करणे खूप कठीण आहे.

  रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, त्यापैकी अनेक जण उपचारादरम्यान ब्रेनडेड होतात. असाच एक ब्रेनडेड रुग्ण 2 मूत्रपिंड, 1 यकृत, 1 हृदय, 2 फुफ्फुस, 1 स्वादुपिंड यांचे संभाव्य दाता असून एकाच वेळी 7 जीव वाचवू शकतो तसेच कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतींचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. 36 केंद्रे आणि हृदय प्रत्यारोपणासाठी 9 केंद्रे असून इतर प्रत्यारोपणासाठी फारच कमी केंद्रे आहेत. राज्यात नेत्र व त्वचा बँका आणि नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरही फारच कमी आहेत.

   या सर्व बाबींचा विचार करून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीषजी महाजन यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. मोहीम राबविण्याकरिताचे राज्यस्तरीय मार्गदर्शन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्यामार्फत होत आहे. संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, सहसंचालक वैद्यकीय शिक्षण डॉ. मिलिंद फुलपाटील सुध्दा हे अभियान राबविण्यात समाविष्ट आहेत. या अभियानाची राज्यस्तरीय अंमलबजावणी वैद्यकीय शिक्षणाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या अध्यक्षतेखाली असून या अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश ताटिया, डॉ. योगेश गवळी आणि डॉ. राकेश वाघमारे करतील.

  या कार्यक्रमाच्या अंतर्गत अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे दि. 07 एप्रिल 2023 रोजी अवयव दान जनजागृती मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले . या जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत शासकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

             या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकर कोळी उपस्थित होते. श्री. कोळी यांनी स्वतःच्या मुलाच्या मृत्यू पश्चात अवयव दान करून जनतेसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले. या कार्यक्रमात यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना अवयव दान करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार व डॉ. लाकाळ यांनीही मार्गदर्शन केले.

            या प्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थी व नरसिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले केले की वैद्यकीय विद्यार्थ्यांनी फक्त बुद्धिमान असून चालणार नाही तर त्यांना सामाजिक बुद्धिमत्ता व भावनिक बुद्धिमत्ता असणे देखील तेवढेच महत्त्वपूर्ण आहे असे सांगितले. त्यांनी शिवशंकर कोळी यांचे आभार मानले व त्यांनी जे अवयव दानाचे पाऊल उचलले आहे ते प्रत्येकाने करायला हवे, असे आवाहन केले.

              तसेच यावेळी रांगोळी व निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण केले. त्यात निबंध स्पर्धेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या शर्वरी केंद्रे, सोनाली मंडके आणि श्रेया पाटील यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले व रांगोळी स्पर्धेमध्ये नरसिंगच्या विद्यार्थीनी साळुंके पौर्णिमा, इंगले कांती आणि सूर्यवंशी यांना प्रथम तर घागरे अंकीता द्वितीय पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. उज्वला गवळी, डॉ. देशमुख, डॉ. हेमलता रोकडे, डॉ. शारदा सोनखेडकर, डॉ. दीपक निर्भोरकर व डॉ. लोणीकर हे उपस्थित होते.

            सर्व शिक्षकवृंद अधिकारी, अधिक संवेदनशील होतील व अवयवदान जनजागृती मोहिमेला एक नवी चेतना व उत्स्फुर्तता मिळेल, या उद्दिष्टाने अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी दि. 31 मार्च 2023 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे अवयव दान या विषयावरती सर्व शिक्षकवृंद अधिकाऱ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नामवंत नेफ्रोलॉजिस्ट व ट्रान्सप्लांट एक्स्पर्ट डॉ. संदीप होळकर यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमामुळे अवयव दान जनजागृती मोहिमेला एक नवी चेतना व उत्स्फुर्तता मिळेल, असे मनोगत अधिष्ठाता डॉ.दोमकुंडवार यांनी कार्यक्रम समाप्ती नंतर व्यक्त केले.

From around the web