उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग खुला

कृषी व महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून नुकसान भरपाई देण्याचे शासनाचे विमा कंपन्यांना निर्देश
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग खुला

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील  वंचित शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम  मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. कृषी व महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश शासनाने विमा कंपन्यांना दिले आहेत. 


उस्मानाबाद जिल्ह्यात जुलै-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. सन 2020 या वर्षी जिल्ह्यातील 14 लाख 53 हजार 540 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता पोटी शेतकरी, राज्यशासन व केंद्र शासनाने मिळुन 1112 कोटी प्रीमियम भरला होता. जुलै-ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील क्षेत्र पाण्यात वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वीजेची व्यवस्था कोलमडली त्यामुळे या शेती क्षेत्राची माहिती, वीज नसल्याने, स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा बंद पडल्यामुळे लाखो शेतकरी ऑनलाईन तक्रारी विमा पोर्टलवर नोंदवू शकले नव्हते. 

उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सन-2021-22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहाराच्या माध्यमातून चर्चेत भाग घेऊन केंद्र सरकारच्या निदर्शनास आणुन दिले होते. तसेच कळंब- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आ.कैलास घाडगे-पाटील यांनी सन-2021-22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न क्र.23957 च्या माध्यमातून प्रश्न उपस्थितीत करून कृषी व महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना विमा देण्यास निर्देश देण्यात यावी अशी मागणी केली होती.

त्याअनुषंगाने दि. 05 मार्च 2021 रोजी कृषी व महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना शासनाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. 


 

From around the web