शिरगापूर आणि चव्हाणवाडी गावात खुलेआम हातभट्टीची दारू विक्री 

२५ ते ३० महिला नळदुर्ग पोलीस स्टेशनवर धडकल्या
 
d
निष्क्रिय सपोनि जगदीश राऊत यांची बदली करण्याची मागणी 

नळदुर्ग -  निष्क्रिय सपोनि जगदीश राऊत यांच्या आशीर्वादामुळे शिरगापूर आणि चव्हाणवाडी गावात खुलेआम हातभट्टीची दारू  आणि शिंदी विक्री सुरु असून, याविरुद्ध महिलांनी रणशिंग फुंकले आहे. 

शिरगापूर आणि चव्हाणवाडी गावात खुलेआम हातभट्टीची दारू आणि शिंदी विक्री सुरु असल्याने तळीरामांची संख्या वाढली आहे. हे तळीराम आपल्या बायकापोराबरोबर भांडण करून संसाराची राखरांगोळी करीत आहेत. मात्र पोलिसांचे संसार फुलत आहेत. 

या हातभट्टीची दारू आणि शिंदी विक्री करणाऱ्याचे नळदुर्ग पोलिसांशी  लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कोणतेही कारवाई  होत नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. 

या दोन्ही गावातील हातभट्टीची दारू विक्री आणि शिंदी विक्री बंद करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी जवळपास २५ ते ३० महिला आज नळदुर्ग पोलीस स्टेशनवर धडकल्या. त्यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देऊन सपोनि जगदीश राऊत  यांचा  निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर आणला. 

निवेदनावर मीरा गायकवाड, शुभांगी जाधव, अंजना जाधव, नागिणी पवार आदींच्या सह्या आहेत. महिलांच्या निवेदनांतर नळदुर्ग पोलिसांनी एका दारू विक्री करणाऱ्यास जुजबी अटक करून सोडून दिले. 

निष्क्रिय सपोनि जगदीश राऊत यांच्या आशीर्वादामुळे नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्वच गावात दारू, मटका, जुगार, गुटखा विक्री तेजीत सुरु असून, गावोगावी महिला समोर येत आहेत. तसेच निष्क्रिय सपोनि जगदीश राऊत यांची बदली करण्याची मागणी  होत आहे. 


 

From around the web