नळदुर्गमध्ये ऑनलाईन जुगार तर अणदूरमध्ये गावठी दारू विक्री जोरात 

सपोनि जगदीश राऊत यांच्या आशीर्वादामुळे अवैध धंद्याचे पीक जोमात 
 
as

नळदुर्ग - सपोनि जगदीश राऊत यांच्या आशीर्वादामुळे अणदूर, नळदुर्ग, जळकोट, ईटकळ आदी गावात  अवैध धंद्याचे पीक जोमात सुरु आहे. नळदुर्गमध्ये ऑनलाईन  जुगार तर अणदूरमध्ये गावठी दारू विक्री जोरात सुरु असताना, राऊत  डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प आहेत. 

अक्कलकोट रस्त्यावर पाटील तांडा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळप केली जाते. हीच दारू अणदूर, नळदुर्ग, जळकोट, ईटकळ आदी गावात किरकोळ दारू विक्री करणाऱ्याना खुलेआम पोहच केली जाते. 

अणदूरचा एक भाग असलेल्या वत्सलानगर ( चिवरी पाटी ) भागात दहा आणि गावात दोन अश्या बारा ठिकाणी गावठी दारूची राजरोस विक्री सुरु आहे. या दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत असताना, पोलिसांचे संसार मात्र फुलत आहेत. दरमहा हप्ता ठरल्याने पोलीस छापा मारीत नसल्याने गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

अणदूर मधील अवैध गावठी दारू बंद करावी म्हणून मागे महिलांनी आंदोलन देखील केले होते, पण पोलिसांच्या आशीर्वादामुळे दारू बंदी होऊ शकली नाही. 

नळदुर्ग शहरात  बसस्थानकाच्या पाठीमागे अध्यापक विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्राच्या शेडमध्ये सहा ते सात ठिकाणी ऑनलाइन जुगार राजरोस सुरु आहे. या जुगावर दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत आहे. तरुण पिढी जुगाराच्या नादी लागून बरबाद होत असताना, पोलीस हप्ता घेऊन बघ्याची भूमिका घेत आहेत. 


नळदुर्ग पोलीस स्टेशनला सपोनि म्हणून जगदीश राऊत जॉईन झाल्यापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असताना वरिष्ठ अधिकारी देखील मूग गिळून गप्प  आहेत. यापूर्वीचे डीवायएसपी टिपरसें यांनी राऊत यांना  पाठीशी घातले होते, त्यांच्या बदलीनंतर ज्यांच्याकडे पदभार आला आहे, त्या मॅडम देखील गप्प आहेत. पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन हे राऊत यांच्यावर याप्रकरणी काय कारवाई करणार  ? याकडे लक्ष वेधले आहे. 

From around the web