लासोना पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे एकाचे प्राण वाचले
पाडोळी - शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे समुद्रावाणी गावालगत असलेल्या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे मेंढा, लासोना, सांगवी गावासह समुद्रवाणी कडून मुरुड कडे जाणाऱ्या अनेक गावचा संपर्क तुटला होता..
यावेळेस रात्री १० वाजण्याच्या दरम्यान बेंबळी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. एम.जी.शेंडगे यांनी लासोना येथील पोलीस पाटील ज्योतिराम काटे यांना फोन केला आणि कळविले की, लासोना चौकातुन समुद्रवाणी जाणारी वाहतुक आडवा, समुद्रावाणी ओढ्याला पूर आला आहे, अपघात होण्याची शक्यता आहे.
अश्या वेळेस धो-धो पाऊस चालु असतानाही पोलीस पाटील ज्योतिराम काटे लगेच घरा बाहेर पडले असता समजले की आताच एक इंडिका पुलावरून वाहून गेली आणि इंडिका मधील चालक पोहत बाहेर समुद्रवाणीच्या बाजुने निघाला परंतु दुसरी व्यक्ती पाण्यातच लासोन्याच्या बाजुने वेड्या बाभळीच्या झाडाला अडकला आहे.
लगेचच लासोना येथील तरुणांना घेऊन धाब्याच्या पाठीमागुन वावरातुन गुडग्या इतक्या चिखलातुन काट्याकुट्यातुन चालत टॉर्चच्या उजेडात शोध घेण्यास सुरुवात केली.मेंढा येथील व्यक्ती पुलापासुन काही अंतरावर बाभळीच्या झाडाला धरुन मदतीसाठी आवाज देत होता.
पोलीस पाटील आणि त्यांचे सहकाऱ्यांनी मानवी साखळी करुन व छोट्याशा दोराच्या सहाय्याने बाहेर काढले, त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.प्राण वाचविलेल्या व्यक्तीचे नाव गोवर्धन विष्णू ढोरमारे ( वय ५५) असे असून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी पोलीस पाटील ज्योतिराम काटे आणि त्यांना सहकार्य करणारे निखील घुले(समुद्रवाणी),इब्राहिम शेख,अब्दुल्ला मेंडके,समीर मेंडके,शफी मोगल,श्रावण भोसले,महेश पवार (सर्व रा.लासोना.) यांचे आभार मानले .