नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी देवीचे एक लाख 16 हजार भाविकांनी घेतले ई-दर्शन

 
s

 उस्मानाबाद -  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी ई-दर्शन पासची सुविधा मंदिर संस्थानने उपलब्ध करुन दिली होती. त्याचा यंदाच्या नवरात्र महोत्सव काळात एक लाख 16 हजार भाविकांनी लाभ घेतला आहे. या ई-दर्शन सेवेचाही  सेवा सुरु झाल्यापासून 30 लाख 59 हजार 742 भाविकांनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध राज्यांतील भाविकांनी ई-दर्शन पासचा लाभ घेतला आहेतच, त्याच बरोबर विदेशातील भाविकांनीही या सेवेचा लाभ घेतला आहे.

श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचे दोन डोस (दोन लस) घेतलेल्या भाविकांना श्री. देविजींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आलेला होता. तसेच 65 वर्षावरिल ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त, गरोदर स्त्रिया आणि दहा वर्षाखालील बालकांना प्रवेश बंद होता.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांना ऑनलाईन ई-दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते.

सध्याचे युग हे माहिती तंत्राज्ञानाचे युग आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग हा अतीशय अफाट आहे, श्री.दिवेगावकर यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने जिल्ह्यांच्या संकेत स्थळावरुन जनतेसाठी विविध विभागाच्या ऑनलाईन सेवा पुरवीण्यात जिल्हा प्रशासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यात एन.आय.सी.ने महत्वाचा वाटा उचलला आहे, याचाच एक भाग म्हणून नवरात्र महोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी http://osmanabad.gov.in या संकेत स्थळावर आणि shri TuljabhawaniLive या Mobile App द्वारे ई-लाईव्ह दर्शन सुविधाही मंदिर प्रशासनाच्या साहाय्याने पुरवण्यात आलेली आहे.

          या सेवेचा लाभ विदेशातील नागरिकांनीही घेतला आहे. या नवरात्र महोत्सवात अमेरिका (1797), युनायटेड अरब देश (232), कॅनडा (246), युनायटेड किंगडम (294), सिंगापूर (179),ऑस्ट्रोलीया (131), स्वित्झर्लंड(83), जर्मनी (83) व ओमन (39) अशा अनेक देशातील (कंसात दर्शवीलेल्या संख्ये इतक्या) भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष बाब म्हणजे यापैकी जास्तीत  जास्त भाविकांनी मोबाईलवरुन या सुविधेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहेत, अशी  माहिती अतिरिक्त जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी पी.एन.रुकमे यांनी दिली आहे.

From around the web