कळंब तालुक्यात सापडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा ( व्हिडिओ )
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील मस्सा ख. गावच्या शिवारात सव्वा कोटी रुपयांचा 1132 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. एका छोट्या गावात इतका गांजा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मस्सा येथील गट नं 675 वरील बालाजी शिंदे यांचा शेत बालाजी छगन काळे आणि राजेंद्र उर्फ दादा छगन काळे हे दोघे बटईने करत होते. त्याच शेतात त्यांनी आर्थिक फायद्यासाठी कोठूनतरी गांजा विक्रीसाठी आणून ठेवला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत शेतातील कडब्याच्या गंजीत ताडपत्री झाकून ठेवलेले 47 पांढरे पोते आढळून आले. पोलिसांनी पोते उघडून पाहिल्यास त्यात गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्याने बालाजी काळे आणि राजेंद्र काळे दोघे जण फरार झाले. पोलीस उपनिरीक्षक निलंगेकर यांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केले. कळंब पोलीस स्टेशनमध्ये आणून पोत्यांचं वजन करण्यात आलं. प्रत्येकी 50 ग्रामचे एक सॅम्पल सीए टेस्टसाठी आणि पोलीस स्टेशनसाठी राखीव म्हणून एक सॅम्पल काढून घेण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या 47 पोत्यांचं वजन केल्यानंतर एकूण 1132.66 किलो गांजा असल्याचे समोर आले. ज्याची एकूण किमंत 11000 रुपये किलोप्रमाणे 1 कोटी 24 लाख 59 हजार 260 रुपये इतकी आहे. गांजा विक्री किंवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा असताना कोट्यवधी रुपयांचा गांजा सापडल्याने उस्मानाबाद जिल्हा हादरला आहे. गुन्हे शाखेने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक निलंगेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, बबन जाधवर, अविनाश मारापल्ले या पथकाने केली.
राज्यात लॉकडाऊन असताना इतक्या मोठ्याप्रमाणात गांजा कोठून आणला? हा महत्वाचा प्रश्न या कारवाई नंतर समोर येतोय. तसेच जिल्ह्यात गांजाविक्री करणाऱ्यांचं मोठं कार्यरत रॅकेट, असू शकतो, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे. रात्री उशिरा कळंब पोलिसात उपनिरीक्षक पांडुरंग माने यांच्या फिर्यादीवरून बालाजी काळे आणि राजेंद्र काळे यांच्या विरोधात एन.डी.पी.सी ऍक्ट कलम 20 ब,ii (C) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
थोडक्यात
फिर्यादी:- पोउपनि पी.व्ही.माने ने. स्था.गु.शाखा,उस्मानाबाद.
आरोपी:- 1)बालाजी छगन काळे 2)राजेंद्र ऊर्फ दादा छगन काळे दोघे रा.मस्सा (खं) ता.कळंब जि. उस्मानाबाद (फरार)
मिळाला माल:- पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचे 47 पोते त्यात एकुण 1132.66 किलो ग्राम वजनाचा गांजा एकुण किंमत 1,24 59,260/- ( एक कोटी 24 लाख 59 हजार 260/- रुपये) रुपयेचा मुद्देमाल.
टिम:- पो.नि.घाडगे साहेब, सपोनि निलंगेकर, पोउपनि माने, पोहेकॉ/218 जगदाळे, पोहेकॉ/ठाकुर, पोना/12 घुगे, पोना/1166 सय्यद, पोना/1569 चव्हाण, पोकॉ/1611 जाधवर, पोकॉ/1631 ढगारे, पोकॉ/1776 मरलापल्ले चा.पोना/583 चोरे, चा.पोकॉ/1424 माने
सर्व नेम. स्था. गु.शा. उस्मानाबाद.