पदवीधर मतदार निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी उपाशीच
उस्मानाबाद - औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण देण्यात आले नसल्यामुळे हे कर्मचारी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करीत आहेत. परंतु मी पाहून घेतो या आश्वासनाला पलीकडे त्या अधिकाऱ्यांनी दुसरा शब्द दिला नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पोट रिकामे राहिले आहे. त्यामुळे अधिकारी तुपाशी तर निवडणूक कर्मचारी उपाशी या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा प्रत्यक्ष अनुभवास आला आहे.
पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गेल्या काही दिवसापासून या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वेगवेगळी प्रशिक्षणे देण्यात आलेली आहेत. तर दि.३१ डिसेंबरपासून हे कर्मचारी या केंद्रावर मुक्कामी असून त्यांची सर्व प्रकारची सोय निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आलेली आहे. मात्र सकाळचा चहा सोडला तर या कर्मचाऱ्यांना दुपारचे तीन वाजून गेले तरी जेवण दिलेली नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संबंधित जेवणाच्या ठिकाणी जाऊन विचारणा केली असता जेवण संपले आहे, असे सांगितल्यामुळे त्यांना जेवणासाठी या परिसरात निवडणूक विभागाने दुसरी कुठलीही व्यवस्था केले नसल्यामुळे ते उपाशी राहिले आहेत.
फक्त पन्नास चपात्या !
श्रीपतराव भोसले हायस्कूल या ठिकाणी सहा मतदान केंद्र असून या मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना दुपारच्या जेवणासाठी ठेकेदाराने केवळ पन्नास चपात्या उपलब्ध करून दिल्यामुळे त्यापैकी केवळ सोळा कर्मचारी जेवण करू शकले तर उर्वरित कर्मचाऱ्यांना जेवण शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
जेवण उपलब्ध करून देऊ - माळी
यासंदर्भात तहसीलदार गणेश माळी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, संबंधित कर्मचाऱ्यांना जेवण उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया स्थानिक पातळीवर सुरु असून ते त्यांना लवकरच घेऊन जातील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.