तेरणा कारखाना कुणी भाड्याने घेईना !

निविदा खरेदीदारांची निविदा प्रक्रियेकडे पाठ, आता मुदत १४ आॅक्टोबर
 
s

ढोकी -  कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेला तेरणा शेतकरी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्यास कुणीही पुढे येताना दिसत नाही.  जिल्हा मध्यवर्ती बँकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेकडे निविदा भरण्याची शेवटच्या दिवशीही कोणीही निविदा दाखल न केल्याने बँकेवर पुन्हा नव्याने मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे.

मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून ओळख असलेला ढोकी येथील  तेरणा शेतकरी साखर कारखाना सन  २०१२ पासून बंद आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची तेरणाकडे व्याजासह ४२५ कोटी थकबाकी आहे. कारखाना सध्या भंगारअवस्थेत असून हा सुरु करायचा  म्हटलं तर जवळपास ४० ते ५० कोटी खर्च अपेक्षित आहे. 

कर्जाच्या ओझ्याखाली जिल्हा मध्यवर्ती बँक दबली असून बँकेला उर्जितावस्था येण्यासाठी जिल्हा बँकेने तेरणा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याकरिता २४ ऑगस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला. चार व्यवस्थापनाकडून निविदा खरेदी करण्यात आली होती. त्यांच्याशी चर्चेनंतर भाडेकरार पंचवीस वर्षाचा करण्यात आला. एकूण प्रक्रियेत मेयर कमोडीटीज इ.प्रा लि.मुंबई, टेवेन्टीवन शुगर्स लि.मुंबई, डीडीएन एसएफए लि.मुंबई, सुक्रोग्रीन, पुणे, या पाच व्यवस्थापनानी निविदा खरेदी केल्याने कारखाना सुरू व्हावा म्हणून आशा उंचावल्या होत्या. बुधवारी साडेपाच कोटी अनामत रक्कम भरुन निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख होती. दुपारी चार वाजेपर्यंत या कोणीही निविदा दाखल न केल्याने संचालक मंडळाच्या बैठकीत या निविदा प्रक्रियेस नव्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवीन निविदा प्रक्रिया अशी असेल
गुरुवारपासून दि.७ आॅक्टोबरपर्यंत निविदा फॉर्म विक्री ज्यांनी निविदा फॉर्म खरेदी केलेले आहेत त्यांच्या समवेत शुक्रवारी प्रीबिड मीटिंग संचालक मंडळासोबत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दि.१४ सप्टेंबरला निविदा दाखल करून घेण्यात येणार असून व त्याच दिवशी त्या उघडण्यात येणार आहेत.

From around the web