उस्मानाबाद जिल्हयातील राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालयातील प्रवेशासाठी आता नो लस नो एन्ट्री  !

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
 
divegavkar

  उस्मानाबाद :- आफ्रिकन देशातील ओमिक्रोन विषाणूचा संभांव्य धोका लक्षात घेऊन आणि कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महत्वाचा एक भाग म्हणून तसेच जिल्हयातील कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हयातील राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यालयात “ लस घेतली नाहीतर प्रवेश नाही ” (No Vaccine No Entry) अशी मोहिम राबविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज जारी केले आहेत.

महाराष्ट्रात  गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. तसेच, देशातील व शेजारच्या राज्यांतील कोविड-19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये, निरंतर आणि सातत्याने घट होत आहे. विविध आस्थापनांकडून कोविड-19 विषयक आवश्यक निर्बंधांचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरुप वर्तनविषयक शिस्त बाळगल्यामुळे हे सर्व यश प्राप्त झाले आहे. राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेलादेखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे.ही वस्तुस्थिती विचारात घेता, राज्य शासनाने अटी आणि शर्तीच्या अधीन राहून, पूर्णत: लसीकरण झालेल्या व्यक्तीं,आस्थापनासाठी आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

       राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करणे हे कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच दिनांक 28 नोव्हेंबर-2021 च्या   मुख्यमंत्री  यांच्या समवेत झालेल्या व्ही. सी. मध्ये टास्क फोर्स सदस्यांनी नमूद केलेल्या मुद्द्यांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचा नवीन धोकादायक व्हेरियंट-ओमिक्रोन  च्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. या व्हेरीयंटचा प्रसार पूर्वीच्या विषाणूपेक्षा अधिक होत असल्याचे आफ्रिकन देशांमध्ये निदर्शनास आल्याबाबत प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित बातम्यांमध्ये दिसून येते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास तोंड देण्यासाठी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.  महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अटी आणि शर्तीच्या अधीन राहून उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णत: लसीकरण झालेल्या व्यक्तीं / आस्थापनासाठी आर्थिक, सामाजिक, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध कमी करण्याचे अनुषंगाने जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 या उपाययोजनांचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयांमध्ये लस घेतली नाहीतर प्रवेश नाही ‘(NO VACCINE NO ENTRY)’  ही मोहिम राबविणेबाबत मार्गदर्शक सूचना आणि आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या विचाराधीन होती. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.जिल्हाधिकारी यांना  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार  प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्र आणि राज्य शासनाची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये या आदेशाच्या दिनांकापासून पुढील 3 आठवड्यांपर्यंत ‘NO VACCINE NO ENTRY’ मोहिम पुढील प्रमाणे राबविणेबाबत आदेश दिेले आहेत.

  संपूर्ण लसीकरणाची व्याख्या :-

संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ-लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत, अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे.  किंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे  किंवा 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीन आठवड्यांपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्र आणि  राज्य शासनाची सर्व शासकीय ,निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘NO VACCINE NO ENTRY’ मोहिम अंतर्गत ज्या व्यक्ती संपूर्ण लसीकरण व्याख्येनुसार पात्र आहेत / लसीच्या दोन्ही मात्रा झाल्या आहेत.

ज्या व्यक्तींनी लसीकरणाची एक मात्रा (डोस) घेतल्यानंतर दुसरी मात्रा (डोस) घेण्याचा निर्धारित कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही केवळ अशाच अधिकारी , कर्मचारी ,अभ्यागत यांना प्रवेशाची परवानगी देण्यात येईल. ‘NO VACCINE NO ENTRY’ या मोहिमेच्या कालावधीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्र व राज्य शासनाची सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयांमध्ये येणा-या अधिकारी, कर्मचारी,अभ्यागत यांनी संपूर्ण लसीकरण व्याख्येनुसार पात्र असल्याचे प्रमाणपत्र, लसीकरणाच्या दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र (अंतिम लसीकरण प्रमाणपत्र)/ लसीकरणाची एक मात्रा (डोस) घेतलेली असल्यास दुसरी मात्रा घेण्यासाठीचा निर्धारित कालावधी पूर्ण झाला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (पहिली मात्रा घेतल्यानंतर मिळणारे तात्पुरते लसीकरण प्रमाणपत्र) सोबत बाळगणे आवश्यक राहील.

       जे अभ्यागत लस (व्हॅक्सीन) न घेता आले आहेत अशांचे अर्ज त्यांचे करीता प्रवेशद्वारावर आवक-जावक कक्ष करुन स्वीकारण्यात यावेत.या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यालयप्रमुखं,विभागप्रमुख यांच्यावर राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

From around the web