गुटखा तस्करीत अडकलेल्या पोलिसांवर अद्याप कारवाई नाही 

वरिष्ठ पोलीस अधिकारी मूग गिळून गप्प बसल्याने उलटसुलट चर्चा 
 
s

नळदुर्ग  - आयशर टेम्पोतील  तीन टन गुटखा रिकामा करून, उलट झिरो पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी नळदुर्गच्या भ्रष्ट पोलिसांची  उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक ( तुळजापूर ) यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली असली तरी याप्रकरणी दोषी पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी मूग गिळून गप्प बसल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील काही पोलिसांचे गुटखा तस्कर नकुल पंडित आणि  राम डोंबे यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध  असल्याचा  पर्दाफाश धाराशिव लाइव्हने केला आहे. गुटखा तस्करी संदर्भात पुराव्यासह बातम्या प्रकाशित होताच, नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या जुन्या साहेबाचा राईट हँड असलेल्या पोलिसाचे दप्तर सील करून चौकशी करण्यात आली तसेच एक सपोनि, एक पोलीस उपनिरक्षक, दोन पोलीस कॉन्स्टेबल आदींची चौकशी करण्यात आली, पण याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई  न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्याना आम्ही दरमहा हप्ता पोहच करतो, त्यामुळे आमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही , फार तर आमची बदली होईल असे नळदुर्गचे भ्रष्ट  पोलीस खासगीत बोलत आहेत, त्यामुळे गुटखा तस्करीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात ओले झाले की  काय ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

काय आहे प्रकरण ? 

निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून  गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री  गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही  झिरो पोलिसांनी  तो जबरदस्तीने आडवून तो सपोनि  सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.  मात्र गोरे यांनी टेम्पोतील माल अज्ञात ठिकाणी रिकामा करून गुटख्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी गाडी अडवणाऱ्या झिरो पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. 

गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर  गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी  त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याची गाडी पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय  राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे  रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल  करण्यात आला आहे. 

आपण ही गाडी पोलिसांच्या सांगण्यावरूनच अडवली होती पण पोलिसांनी आपणावर खोटा गुन्हा दाखल  केल्याचे या झिरो पोलिसांचे म्हणणे आहे. आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ )  अडवताना एका  वसूलदार पोलिसांची  टू व्हीलर गाडी वापरण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. नळदुर्ग बसस्थानक आणि नळदुर्ग टी  पॉईंटजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यास ती गाडी कोणत्या पोलिसाची होती, हे उघड होणार आहे. या वसूलदार पोलिसांचे नाव झिरो पोलिसांनी व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केले आहे. 

From around the web