राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आई तुळजाभवानीला साकडे

तुळजापूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या टप्प्यातील परिवार संवाद दौर्याला मराठवाड्यातून आजपासून सुरुवात झाली असून तुळजाभवानी आईचे दर्शन महाद्वारात उभे राहून घेत राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभ केला.
राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर कर आणि अडचणीत आलेल्या सर्व घटकांना त्यांच्या जगण्याला उमेद द्यावी आणि राज्याला पुन्हा एकदा सुखसमृद्धी मिळू दे असे साकडे आई तुळजाभवानीकडे जयंत पाटील यांनी यावेळी घातले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.
परिवार संवाद दौर्याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला होता.त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने यापुढील दुसरा टप्प्यातील दौरा स्थगित करण्यात आला होता. आता हाच दुसरा टप्पा मराठवाड्यातून पुन्हा सुरू झाला आहे. ११ दिवसात ४६ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे थेट संवाद साधणार आहेत.
या दौऱ्याचा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करुन आखण्यात आला आहे. शिवाय याची रुपरेषा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि यंत्रणांना कळवण्यात आली आहे.