ओला दुष्काळ : शरद पवार यांचे उस्मानाबाद जिल्ह्यात आगमन
उस्मानाबाद - मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. 18 आणि 19 ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.शरद पवार यांचे काही वेळापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात आगमन झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दोन दिवसांमध्ये पवार हे तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे भेट देतील.
शरद पवार यांनी यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. या दौऱ्याचा आढावा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. यानंतर राज्य सरकारने नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेतला होता. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मिळते हा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.