माझे कुटूंब, माझी जबाबदारी सर्वेक्षणात कोरोना, आयएलआय व सारीचे ५ हजार २८३ रुग्ण सापडले

 
s

उस्मानाबाद  - जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी टप्पे अंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करण्याचा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये कोरोना, आय‌एलआय व सारी या आजारांचे ५ हजार २८३ रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात २० मे रोजी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मे महिन्यात १० पेक्षा अधिक रुग्ण असणारी १५२ गावे आढळली आहेत. या गावामध्ये  रॅपिड व आरटीपीसीआर चाचणी घेण्यासाठी पुरेशा प्रमाणात किड्स पुरविण्यात आले आहेत ज्या गावांमध्ये चाचण्या कमी होत असल्याची तक्रार आहे त्या गावांमध्ये किड्स पोचविण्यात येत आहेत. याची तहसिलदार, गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच माझे कुटूंब, माझी जबाबदारी या अभियानामध्ये जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात ५९ हजार ७८८ व्यक्ती सहव्याधी असणाऱ्या आढळल्या आहेत. त्यापैकी २४ हजार व्यक्तींना कोरोना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर अजून कमी करण्यासाठी उर्वरित ३५ हजार सहव्याधी असलेल्या व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे यासाठी ग्रामपंचायत स्तरापर्यंत नियोजन करून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांनी पुढाकार घ्यावा. 


तसेच पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे सर्वाधिक रुग्णावर उपचार झाले आहेत. मात्र यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १० बेड व ग्रामीण रुग्णालयात किमान ३० बेडची सोय करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नियोजन करावे. तर ज्या रुग्णांना मध्यम लक्षणे आहेत व ऑक्सिजनची गरज ५ लिटरपर्यंत आहे, अशा रुग्णांसाठी किमान ४०० ऑक्सिजन ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले.  आयसीयू सुविधा अद्ययावत करण्यासाठी व्हेंटिलेटर देखभाल-दुरुस्ती कार्यक्रम राबवावा, ऑक्सिजन पुरवठा साधनांची स्वच्छता नियमित करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तर राज्य सरकारच्या सूचना प्रमाणे एमएलओ अतिरिक्त प्रकल्प हवेतून ऑक्सिजन प्रकल्प जे २०-३० सिलेंडरची गरज स्थानिक स्तरावर भागू शकेल याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाच्या ऑक्सिजन टास्क फोर्सने तातडीने करावी. यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

तसेच रुग्णांची संख्या घटत असली तरी जिल्हा कारागृह व वस्तीगृहामध्ये झालेला कोरोना संसर्ग यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही गतीने होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे. तर सध्या पॉझिटिव्हचे प्रमाण १८ टक्के आढळून आले असून जोवर हा दर ५ टक्के हून कमी होत नाही. तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात केले. तर नागरिकांनी खासगी रुग्णालयांकडून निर्धारित केलेल्या दरांपेक्षा अधिक दराने आकारणी झाली असल्यास ऑडिट टीम प्रमुख  मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्याकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे. 

या बैठकीस पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदीसह जिल्हा परिषद व इतर अधिकारी उपस्थित होते.

From around the web