महावितरणकडून शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवावा अन्यथा वेगळ्या भाषेत सांगावे लागेल

खा.ओमराजे निंबाळकर यांचा महावितरण कंपनीला निर्वाणीचा इशारा
 
omraje

धाराशिव -  एका बाजुला पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचे पिक वाळुन जात आहे, तर दुसऱ्या बाजुला पर्यायी स्त्रोताद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला तर महावितरणकडुन विज उपलब्ध होत नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने यापुढे विजपुरवठा सुरळीत न केल्यास कोणाची गय केली जाणार नाही, शेतकऱ्यांसाठी माझ्या अंगावर किती केसेस झाल्या तरी मी त्याची पर्वा करणार नाही याची नोंद कंपनीने घ्यावी असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यानी दिला आहे.

          जुन,जुलै महिन्यामध्ये पावसांची टक्केवारी अत्यंत कमी होती, तर ऑगस्ट पुर्णतः कोरडा गेल्याचे चित्र आहे. जेव्हा पिकाला पाण्याची आवश्यकता आहे तेव्हाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पाण्याअभावी पिके सुकुन वाळु लागली आहेत. अशावेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे अन्य स्त्रोत आहेत त्यानी पिकाना पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हा तिथे विज उपलब्ध नसल्याचे दिसत आहे, असंख्य शेतकऱ्यांकडुन या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

           ठरवुन दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेळ विज जात असल्याने कोणत्यावेळी पाणी द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांतुन विचारला जात आहे. महावितरण कंपनीकडुन जाणीवपुर्वक शेतकऱ्याना त्रास देण्याचा हा प्रकार अत्यंत चिड आणणारा आहे, त्यामुळे कंपनीकडुन यापुढे असा प्रकार केल्यास त्यांची गाठ माझ्याशी असेल एवढ लक्षात घ्यावे.

                   असा इशारा खासदार राजेनिंबाळकर यानी दिला आहे. आमदार कैलास पाटील, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिकांच्या उपस्थित सोमवारी (ता.चार) सकाळी अकरा वाजता महावितरणच्या विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. सूरुवातीला लोकशाही मार्गाने इशारा देण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाने फरक पडला नाहीतर पुन्हा वेगळा पर्याय अवलंबावा लागेल असेही ओमराजे यानी सांगितले आहे. अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा संयम अजुनही टिकुन आहे याचा अर्थ ते शांतच राहतील असे नाही, त्यांचा संयम सुटल्यास कंपनीला पळताभुई थोडी होईल त्यामुळे तुमच्या व्यवस्थेत बदल करा अन्यथा कोणीच तुमची गय करणार नसल्याचा सल्ला ओमराजे यानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.  

From around the web