खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोप तथ्यहिन

  वसंतदादा सहकारी बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांचे प्रत्युत्तर
 
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोप तथ्यहिन

उस्मानाबाद - बंद असलेला तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी वसंतदादा बँकेने मोठी मदत केली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या विनंतीवरूनच 72 वाहतूक ठेकेदारांना  बँकेने ऊस तोडणी व वाहतूक व्यवसायासाठी मालमत्ता तारण कर्ज दिले. बँकेच्या नियमानुसार त्या कर्जाची वसूली प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याउपर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ढवळे यांच्या आत्महत्त्येप्रकरणी बँकेवरील करीत असलेले आरोप तथ्यहिन आहेत. वसंतदादा बँकेची कोणीही हेतूतः बदनामी करू नये, अशा शब्दांत बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बँकेने 11 शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याऐवजी सर्व कर्जदार ठेकेदारांच्या खात्यात समप्रमाणात विभागल्यामुळेच ढवळे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप खासदार राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला कोणत्याही प्रकारचा आधार नाही. यापुढे बँकेवर आरोप करताना कागदोपत्री पुरावे दाखवा, असेही आवाहन दंडनाईक यांनी केले आहे.

 नियमाप्रमाणे 72 वाहतूक ठेकेदारांना वैयक्तिक नावावर कर्ज दिले होते. त्याच्या वसुलीसाठी मार्च 2011 अखेर कारखान्याकडे ऊस तोडणी व ठेकेदार यांच्या नावाची यादी देवून 70 लाख ७६ हजार ५०० रूपयांची थकीत रकमेची मागणी केली. त्यानुसार कारखान्याने 70 लाख ७६ हजार ५०० रूपयांची रक्कम बँकेकडे दोन हप्त्यात जमा केली. जमा करण्यात आलेली रक्कम कर्जदारांच्या खात्यात नियमानुसार जमा-खर्च करून कारखान्यास त्याचवेळी पोच देण्यात आली. पुढील कर्ज हप्त्याची मागणी केल्यानंतर कारखान्याने 19 लाख 40 हजार रूपये बँकेस दिले. ही रक्कम देखील कर्जदारांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर मात्र 72 कर्जदारांचे खाते थकीत गेल्यामुळे बँकेला आरबीआयच्या निर्देशानुसार वसुलीची कारवाई स्वीकारावी लागली. यातील काही कर्जदारांनी बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागीतली. मात्र न्यायालयाने बँकेच्या वसुलीला योग्य ठरविले असल्याचे दंडनाईक यांनी सांगितले.

बँकेने 72 जणांना दिलेले कर्ज नियमाप्रमाणे मालमत्ता तारण घेवून दिलेले आहे आणि कर्जाची वसुली करणे कायद्याने बंधनकारक आहे. अशा थकीत कर्जामुळेच बँक सध्या निर्बंधात आहे. कर्जवसुली कायदेशीर प्रक्रियेने करण्याचे काम सध्या बँक करीत आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात बँकेचा कसलाही दोष नाही. वसंतदादा बँकेसंदर्भात खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा पुनरूच्चार बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी केला असून यापुढे बँकेची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.


 

From around the web