शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक 

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आढावा बैठक
 
as

धाराशिव  - धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा आणि इमारतीची गरज आहे.यासाठी लवकरच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करु अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने आढावा घेतांना आयोजित बैठकीत दिली.

              दोन वर्षांपूर्वी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे महाविद्यालय कार्यरत आहे.आता पुढच्या वर्षांसाठी नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे महाविद्यालयास जागा कमी पडत आहे.तसेच जिल्हा रुग्णालयास होत असलेली गैरसोय पाहता  वैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकरात लवकर जमीन संपादन करुन त्यावर इमारतीचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,असेही ते म्हणाले.

         मुश्रीफ यांनी या आढावा बैठकीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जागा उपलब्ध झाल्यास तात्काळ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात येईल.यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही असेही म्हणाले. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच याविषयी वैद्यकीय शिक्षण सचिव व उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधीची बुधवार 30 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेण्याचेही नियोजित केले.

as

                 येथील वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक मनुष्यबळ व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही श्री.मुश्रीफ यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांशी चर्चा करतांना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व वैद्यकीय शिक्षण संघटनेची निवेदनेही स्विकारली.

                वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे,अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार,उपअधिष्ठाता उज्वला गवळी,डॉ.सचिन देशमुख, प्रा.डॉ.मंगेश सेलूकर,प्रा.डॉ.सुषमा जाधव,प्रा.डॉ.सदानंद भिसे, डॉ.विश्वजीत पवार,डॉ.उदयकुमार पाध्ये,डॉ.संजय मगर,डॉ.योगेश गालफाडे तसेच वैद्यकीय शिक्षण संघटनेचे पदाधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

From around the web